खासगीकरणास सोनिया गांधींचा विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019
  • लोकसभेत मोदी सरकारवर टीका; धनदांडग्यांनाच फायदा
  • लोकसभेत या अधिवेशनात विरोधी बाकांवर असलेल्या सोनिया गांधी सातत्याने आक्रमक

नवी दिल्ली - यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी आज लोकसभेत रायबरेली कोच फॅक्‍टरीच्या निमित्ताने मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविताना, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू असल्याचा आणि धनदांडग्यांना फायदा पोचविला जात असल्याचा आरोप केला. बीएसएनएल, एमटीएनएलच्या दयनीय अवस्थेवरूनही सोनियांनी सरकारवर प्रहार केले.

लोकसभेत या अधिवेशनात विरोधी बाकांवर असलेल्या सोनिया गांधी सातत्याने आक्रमक राहिल्या असून आज शून्य काळात त्यांनी रायबरेली कोच फॅक्‍टरीच्या मुद्द्यावर देशाच्या मौल्यवान संपत्तीचे कवडीमोल भावाने खासगीकरण केले जात असल्याची तोफ मोदी सरकारवर डागली. या अशा निर्णयामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार होतील, असाही आरोप त्यांनी केला. राहुल गांधी या भाषणादरम्यान लोकसभेत दाखल झाले.

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ घोषणेवरही त्यांनी कोपरखळी लगावली. सोनिया म्हणाल्या, की पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे सार्वजनिक उद्योग म्हणजे देशाच्या विकासाची किल्ली असल्याचे मानत होते. परंतु सध्याचे सरकार कष्टकरी आणि गरिबांकडे दुर्लक्ष करून काही धनदांडग्यांच्या फायद्यासाठी काम करत आहे. कष्टकऱ्यांचे हक्क हिसकावून काही उद्योगपतींना कशा प्रकारे फायदा पोचविला जात आहे ही बाब लपून राहिलेली नाही. या प्रयोगासाठी रायबरेलीतील कोच फॅक्‍टरीची निवड केली आहे.

प्रत्यक्षात ही फॅक्‍टरी सरकारच्या यशस्वी प्रकल्पांपैकी एक असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिग पंतप्रधान असताना देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी म्हणजेच ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ही फॅक्‍टरी सुरू करण्यात आली होती. या फॅक्‍टरीच्या खासगीकरणासाठी सरकार का आतुर आहे हे कळत नाही. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा का बंद करण्यात आली हे माहीत नाही. एचएएल, एमटीएनएल, बीएसएनएल या सरकारी कंपन्यांसोबत काय होते हे लपून राहिलेले नाही, असाही चिमटा सोनियांनी या वेळी काढला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News