कुणी लिहिले प्रेमपत्र; तर कुणी दिली धमकी, बोर्डाच्या परीक्षेचा हाहाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • बारावीच्या पेपरमध्ये दीडशे उत्तरपत्रिकांत आक्षेपार्ह मजकूर

औरंगाबाद -  बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप धास्ती असते. विद्यार्थी खूप अभ्यास करून पेपर लिहितात; मात्र यावर्षी झालेल्या बारावीच्या पेपरमध्ये औरंगाबाद विभागातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केले. यात काहींनी उत्तराऐवजी चक्क प्रेमपत्र लिहिले, तर काहींनी उत्तीर्ण करा; अन्यथा घरून पळून जाईल, अशी धमकी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली. यामध्ये दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये उत्तरे लिहिण्याऐवजी आक्षेपार्ह मजकूर लिहिला. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी चक्क मराठी, हिंदी चित्रपटांतील गाणी लिहिली; तर काही विद्यार्थ्यांनी घरची परिस्थिती नाजूक असल्याने मला पास करावे, अशी विनंती केली. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचे शेवटचे पानच फाडून घेतलेले आढळले. काही विद्यार्थ्यांनी प्रेमपत्र; तर काहींनी मला पास करावे. नाही तर मी घरातून पळून जाईल, अशा धमकीचा मजकूर लिहिलेला आढळला.

बोर्ड करणार शाळांना सूचना
आक्षेपार्ह सर्व पेपरबाबत बोर्डाकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांना माहिती दिली जाणार आहे. दरवर्षी दहावी, बारावीचे पेपर सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय, संस्थांना मुलांनी पेपर कसा लिहावा, याबाबत शिबिर घेण्याचे आवाहन बोर्डामार्फत करण्यात येते. बहुतांश शाळा, महाविद्यालये याबाबत मार्गदर्शन करतात; मात्र अनेक शाळा उदासीनता दाखवितात. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये काय लिहू नये, प्रश्‍न कसे सोडवावेत, उत्तरपत्रिका कशी लिहावी, याबाबत प्रत्येक शाळांनी मार्गदर्शन करावे, अशी सूचना करण्यात येणार आहे, असे बोर्डाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News