पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण करणारे श्रमदान

महामुनी मंजिरी, सातारा
Tuesday, 9 July 2019

लहानपणासूनच जर मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड निर्माण केली तर मोठेपणी नक्कीच कोणतेही झाडं तोडताना ती दहा वेळा विचार करतील. पण हे संस्कार आतापासूनच त्यांच्यावर व्हायला हवेत. तरच आपल्या पृथ्वीचा कायापालट होइल

'शाळा' म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते शाळेतले शिक्षक! कधी समजावणारे, मनापासून शिकवणारे, तर कधी आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून दटावणारे! यासोबतच,आपला वर्ग, ती मधली सुट्टी, आपले मस्तीखोर मित्रमैत्रिणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेचा निसर्गरम्य परिसर...!

बापूजींच्या पदस्पर्शाने  पावन झालेली, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेली, उरमोडी नदीच्या काठी वसलेली आमची निसर्ग सौंदर्याने नटलेली आमची सुंदर शाळा..! आता पावसाळा सुरू झाला. आणि यासोबतच शाळेची एक गोड आठवण उचंबळून वरती आली. आमची शाळा सुरू झाली की, काही दिवसांतच शाळेत एक 'स्तुत्य व पर्यावरणपूरक उपक्रम' राबवला जायचा.

तो म्हणजे, नुकताच पावसाळा सुरू झालेला असायचा त्यामुळे शाळेमध्ये या उपक्रमाअंतर्गत 'वृक्षलागवड' केली जायची. ती ही मोठ्या उत्साहात बर का! काही मुले तर घरूनच छान-छान रोपे घेऊन यायची व शाळेत त्याची लागवड करायची. एवढ्यावरच हे थांबत नव्हते तर, जी रोपे, झाडे शाळेमध्ये आहेत त्यांची माती बदलून, त्यांना खते घालून, त्या जागेची स्वच्छता करून ती पुन्हा लावली जायची. मुख्यतः शाळेतून पर्यावरणास हानिकारक असणारे 'प्लास्टिक' हद्दपार केले जायचे.
           
या श्रमदानासाठी केवळ मुलेच नाही तर शिक्षक देखील खूप उत्सुक असायचे. नवीन नवीन प्रकारची रोपे लावताना शिक्षक आम्हा मुलांना झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगायचे. या उपक्रमामुळे आम्ही सर्व नकळत निसर्गाकडे ओढले गेलो. आमच्या मनात पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण झाले. शाळेतील मुलांनी ती झाडे स्वः लावली असल्याने ते त्यांची मनापासून काळजी घेऊ लागले. त्यांच्यामध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण झाली. जी जागरूकता सध्याच्या युगात आवश्यक आहे.

आज आपण पाहतोय जिकडे तिकडे दुष्काळाचे सावट पसरले आहे. या रखरखत्या उन्हात पाण्यासाठी आबालवृद्धांना वणवण हिंडावे लागत आहे. आणि या परीस्थितीला खरंतर आपणच कारणीभूत आहोत. आपणच विकासासाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे आज हे विदारक चित्र दिसत आहे.
         
मित्रांनो, आपणदेखील हे चित्र बदलू शकतो.अधिकाधिक वृक्षांची लागवड करून पुन्हा आपल्या धरणीला हिरवीगार करू शकतो. यासाठी आवश्यकता आहे ती आपणा सर्वांनी एकत्र येण्याची! ज्याप्रमाणे 'वृक्षलागवड व संवर्धनाचा' उपक्रम आमच्या शाळेत राबवला जातो की, ज्यामुळे बालवयातच मुलांमध्ये निसर्गप्रेमाचे बीज पेरले जातात, मुलांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण होते, असे उपक्रम इतर शाळांमध्येही राबवले जावेत. अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे आपली पृथ्वी पुन्हा हिरवीगार बनण्यासाठी मदत होइल. जे संस्कार शाळेमध्ये केले जातात ते संस्कार कायम टिकतात.

लहानपणासूनच जर मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड निर्माण केली तर मोठेपणी नक्कीच कोणतेही झाडं तोडताना ती दहा वेळा विचार करतील. पण हे संस्कार आतापासूनच त्यांच्यावर व्हायला हवेत. तरच आपल्या पृथ्वीचा कायापालट होइल. हे सर्व मुलांमध्ये रुजवण्यासाठी शाळा हे उत्तम माध्यम आहे. जिथूनच मुलांची खरी जडणघडण सुरू होते. आज माझ्यामध्ये, आम्हा मित्रमैत्रिणी मध्ये जे पर्यावरणविषयक प्रेम आहे, जागरूकता आहे, याचे सारे श्रेय आमच्या 'श्री रामकृष्ण विद्यामंदिर' लाच जाते. यासाठी मी शाळेची खूप ऋणी आहे.
        
मित्रांनो, आज पाण्यासाठी वणवण करीत फिरणाऱ्या आबालवृद्धांची कसरत आपण पाहतोय. आपण या पावसाळ्यात यांच्यासाठी छोटीशी मदत करू शकतो. "प्रत्येकाने एक तरी झाड लावा, फक्त लावू नका तर त्याच संवर्धन करा". मग बघा सारी सृष्टी कशी हिरवागार शालू नेसून, फुलाफळांनी बहरून, पशुपक्ष्यांसंगे बागडेल. आणि या मनोरम्य दृष्यामध्ये आपला देखील खारीचा वाटा असल्याचा आनंद आपल्याला मिळेल चला तर मग! प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच हे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. तयार आहात ना मग...??

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News