अण्णाभाऊच्या साहित्यातील सामाजिकता

रवींद्र गोळे
Friday, 19 July 2019

बालपणापासून कष्ट आणि उपेक्षेचे धनी असणारे अण्णाभाऊंनी आपल्या जगण्यातील दुःख वेदना चव्हाट्यावर मांडण्यापेक्षा इतराच्या वेदना समजून घेणे आणि ते शब्दातून साकार करणे महत्त्वाचे मानले. म्हणून त्यांचे जीवन व्यक्तीकेंद्री न राहता समाजकेंद्री झाले. समाजाची वेदना त्यांना आपली वाटली, समाजातील उपेक्षित त्यांना आपले जीवलग वाटले.

मराठी साहित्यात एका तुकारामाची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. तर दुसऱ्या तुकारामाची शाहिरी. समाजाबाबत विलक्षण कळवळा हे दोघांचे साम्यस्थळ. बुडती हे जन पाहवेना डोळा असे म्हणत पहिला तुकाराम उपेक्षित, वंचिता बरोबर ठाम उभा राहतो तर दुसरा तुकाराम कष्टकरी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या वेदना आपल्या काव्यातून वेशीवर टांगतो. पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम महाराज तर दुसरा तुकाराम म्हणजे अण्णाभाऊ साठे .अण्णाभाऊचे पाळण्यातले नाव तुकाराम.

१ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगावच्या मांगवाड्यात त्यांचा जन्म झाला आणि १८ जुलै १९६९ रोजी घाटकोपरच्या चिरागनगर मध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. एवढ्या छोट्या कालखंडात अण्णाभाऊंनी डोंगराएवढं काम केले आणि आपल्या नावाची मुद्रा मराठी भाषा व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतात उमटवली. अल्प काळात सुमारे ३५ कांदबऱ्या, १४ लोकनाट्ये, ३ नाटके, १३ कथासंग्रह आणि विपुल काव्यलेखन अण्णाभाऊ नी केले आहे. आज अण्णाभाऊ च्या नावाची विविध अध्यासने वेगवेगळ्या विद्यापीठातून चालवली जातात. पण अण्णाभाऊ चे शिक्षण केवळ दिड दिवस झाले. दिडदिवसाच्या शाळेत शिकलेला हा माणूस मराठी साहित्यातील अक्षर रत्नाचा निर्माता झाला. हा चमत्कार नाही तर अण्णाभाऊंनी स्वतःच्या निरिक्षणशक्ती, कष्ट, चिकाटी यातून स्वतःला सिद्ध केले. 'असाध्य ते साध्य करीता सायास ' हे सुभाषित अण्णाभाऊंनी आपल्या कृतीतून साकार केले आहे.

बालपणापासून कष्ट आणि उपेक्षेचे धनी असणारे अण्णाभाऊंनी आपल्या जगण्यातील दुःख वेदना चव्हाट्यावर मांडण्यापेक्षा इतराच्या वेदना समजून घेणे आणि ते शब्दातून साकार करणे महत्त्वाचे मानले. म्हणून त्यांचे जीवन व्यक्तीकेंद्री न राहता समाजकेंद्री झाले. समाजाची वेदना त्यांना आपली वाटली, समाजातील उपेक्षित त्यांना आपले जीवलग वाटले. त्याच प्रमाणे समाजातील सज्जनशक्तीचा त्यांनी गौरव केला. या सज्जनशक्तीचा अधिकाधिक विकास व्हावा आणि त्यांचा संपूर्ण समाजावर प्रभाव निर्माण व्हावी अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच त्या लेखनात बरबाद्या कंजाऱ्या पासून विष्णूपंत कुलकर्ण्या पर्यंत समाजातील सर्व स्तरातील व्यक्तीरेखा येतात.

समाजातील सुखदुःखाशी ते समरस झाले होते. त्याच प्रमाणे इथली संस्कृती आणि संस्कार यांचा त्यांना अभिमान होता, त्याच प्रमाणे समाजात अस्तित्वात असणाऱ्या कुप्रथा अंधरूढी यांचा त्यांना तिटकारा होता. समाजातील सारे भेद लयास जाऊन सर्व समाज बांधव एका समान पातळीवर यावा अशी त्यांची इच्छा होती. आणि याच कारणासाठी ते लिखाण करत असत. एका ठिकाणी ते म्हणतात,"जुन्या चालिरिती दूर कराव्या आणि आणि लोप पावलेल्या पण प्रगत प्रथांना पुढे आणावे, हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि महाराष्ट्रातून प्रेम व सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी, संपन्न व्हावी अशी श्रद्धा हदयात घेऊन मी लिहितो."

अण्णाभाऊ वरील उद्दात विचारासाठी लेखन करतात तेव्हा महाराष्ट्रातील तत्कालिन सामाजिक जीवन आणि त्यातील वाईटपणा यांना केंद्र केल्याचे लक्षात येते. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनात समाज जीवन मांडताना केवळ वास्तवच मांडले. ते लिहितात,"मी जे जीवन जगलो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबत मी स्वतःला बेडूक समजतो. माझी सारी पात्रे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत. माझी माणसं ही वास्तव आहेत. जिवंत आहेत. "वास्तवातील माणसाच्या कथा लिहिताना अण्णाभाऊनी या माणसांचे सुख, दुःख, वेदना, उपेक्षा आणि जगण्याचा संघर्ष शब्दबद्ध करताना त्यांची जगण्यांची प्रचंड उर्मी, येणाऱ्या अडचणी शी चार हात कळण्याची जिद्द ते अधोरेखीत करत असतात.

समाजातील चांगुलपणा अधिक वाढावा त्यासाठी ते आपल्या लेखनातून आदर्शवत व्यक्तीरेखा उभ्या करतात. या व्यक्तीरेखा विविध जातीसमुहातील आहेत. केवळ पुरूषच नाही तर स्त्री व्यक्तीरेखा साकार करताना अण्णाभाऊ माणसाच्या अंगभूत गुणांना आणि त्या विकसित होण्याच्या उर्मी ला, सकारात्मक बंडखोर वृत्ती ला आदर्श म्हणून उभे करतात. अण्णाभाऊ समर्थ लेखक होते. समाजमन त्यांना कळले होते आणि म्हणून समाजाशी एकरुप होत त्यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा मिळेल असे लेखन केले. आयुष्यभर भोगलेले दुःख कुरवाळत न बसता अण्णाभाऊनी त्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधला उमेदीच्या काळात ते कामगार चळवळीत सहभागी झाले.

त्याच प्रमाणे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळही गाजवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांची माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड खूप गाजली. महाराष्ट्रापासून तुटलेल्या भूभागाच्या, तेथील माणसांच्या भावना अण्णाभाऊंनी आपल्या समर्थ लेखणीतून साकार केल्या. आपल्या काव्यातून त्यांनी जसं लावण्याची नजाकत मांडली तसंच अन्याय अत्याचारा विरूद्ध बंड करण्यांची प्रेरणाही जागवली आहे.

कथा, कांदबरी, लोकनाट्ये, काव्य अशा विविध साहित्य प्रकारांना लिलया हाताळणाऱ्या अण्णाभाऊ ची लेखन प्रेरणा काय होती? कशासाठी ते लिहित होते? अण्णाभाऊ म्हणतात, "माझा माझ्या देशावर, जनतेवर व तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध व्हावा. इथे समता नांदावी, या भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहता पाहता मी लिहीत असतो. "म्हणजेच एका अर्थाने अण्णाभाऊ सर्वमंगलाची अभिलाषा मनी ठेऊन जगले आणि तिच भावना जोपासत त्यांनी लेखन केले त्यामुळे ते अजर आहे. अण्णाभाऊ हे याकाळातील महान समाज चिंतक होते. त्यांचे हे चिंतन आपण आपल्या कृतीतून सिद्ध केले तर त्यांना खरी आदरांजली ठरेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News