हिंगणघाट येथे खुलेआम झाडांची कत्तल; नगर पालिकेची मूक संमती

 निखिल ठाकरे 
Saturday, 14 September 2019
  • न्यु यशवंत नगर येथील विवेकानंद सोसायटीच्या बगिच्यातील २५ वर्ष जुनी असलेली रेन ट्री ची ६ तर निलगिरीचे १ झाड मुळापासून तोडण्यात आली

हिंगणघाटः महाराष्ट्रात वन आच्छादन वाढावे यासाठी सरकार कोटी-कोटी वृक्ष लागवडीचं आवाहन दरवर्षी करतं. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधीही खर्च केला जातो. नगर पालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थानासुद्धा वृक्ष लागवडीच उद्दिष्ट दिलं जातं. अशाच प्रकारचं लक्ष्य हिंगणघाट नगर पालिकेलाही दरवर्षी दिल्या जाते. परंतु, येथे वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष तोडीवर अधिक भर दिसून येतो.

न्यु यशवंत नगर येथील विवेकानंद सोसायटीच्या बगिच्यातील २५ वर्ष जुनी असलेली रेन ट्री ची ६ तर निलगिरीचे १ झाड मुळापासून तोडण्यात आली. येथील रहिवासी श्री. नितीनजी सिंगरू यांनी या विरोधात नगर पालिकेत तक्रार केली. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर यांनी घटनेची पाहणी करून वृक्ष अधिकारी श्री. अनिलजी नासरे यांना याविषयी विचारणा केली असता नगर पालिकेने फांद्या तोडण्याची परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

आणि सविस्तर माहितीसाठी वरिष्ठ अभियंता श्री. संजयजी मानकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडूनही स्पष्ट काही कळले नाही. आणि प्रत्यक्षात झालेल्या वृक्ष तोडीवर मौन असल्याने या वृक्षतोडीला नगर पालिकेची मूक संमती होती का? असा प्रश्न उभा राहतो. एकीकडे शहरातील काही पर्यावरण प्रेमी संस्था तसेच व्यक्तीगत स्तरावर शेकडो झाडं लावून त्याचे संगोपन करण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे ज्या नगर पालिकेवर वृक्ष रोपणाची मोठी जबाबदारी आहे. ती मात्र वृक्ष तोडीला मूक संमती देते.

या गंभीर विषयावर मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी पर्यावरण संवर्धन संस्था, वणा नदी संवर्धन समिती, निसर्ग वेध मंडळ तसेच निसर्ग प्रेमींनी केलेली आहे. अन्यथा या वृक्षतोडी विरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

या वृक्षतोडीबद्दल स्थानिक नगर सेवक तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य श्री. मनिष देवढे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार झाडाच्या फांद्या तोडण्यासंदर्भात दिलेल्या अर्जावर मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांची या अर्जावर स्वाक्षरी होती. काही झाड अर्ध्यातून तर काही झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी देण्यात आलेली होती. परंतु शहरातील कुठलेही झाड तोडताना किंवा फांदी तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी आवश्यक असते. परंतु अशा कुठल्याही प्रकारची बैठक न घेता परस्पर निर्णय घेऊन वृक्ष तोडीला मूक संमती दिल्याचे लक्षात येते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News