श्रावण भिनलाय अंगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019

श्रावण महिन्याबरोबर आपली मनेही हिरवी झालेली असतात आणि या श्रावणाचे विविध रंग आपल्या घरामध्येही खुलायला लागतात.

‘श्रावण आला गं वनी श्रावण आला’ हे सुस्वर अचानक ऐकू येतात आणि मन आनंदून जाते. आधीपासूनच श्रावणसरी येत असतात, म्हणजे अचानक पावसाची सर येऊन परत ऊन पडते. इंद्रधनूही आकाशात आपले सप्तरंग खुलवून जातात. धरणीमाय हिरवीगार झालेली असते. अंगणात प्राजक्ताचा सडा पडलेला असतो. रंगीबेरंगी तेरडाही फुललेला असतो. या श्रावण महिन्याबरोबर आपली मनेही हिरवी झालेली असतात आणि या श्रावणाचे विविध रंग आपल्या घरामध्येही खुलायला लागतात.

नवीनच लग्न झालेल्या सुनेला, सासूबाई प्रत्येक सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ वाहायची याची माहिती देतात. सूनही कितीही घाईत असली तरी ऑफिसला जाताना भगवान शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे देवाला शिवामूठ वाहते. मंगळवारी तर काय मजाच असते. काही सूना एरव्ही कितीही मॉडर्न वागत असल्या तरी मंगळवारी, मंगळागौरीची रीतसर पूजा करून रात्री नऊवारी नेसून मैत्रिणींसोबत मंगळागौर साजरी करतात. झिम्मा, फुगड्या, गाण्यांनी घर गायला लागते. स्त्रियांच्या हातावरील मेंदीचा लाल रंग, घराला आणखी रंग चढवतो.

मंगळागौरीसाठी खास बनवण्यात येणाऱ्या मटकीची उसळ आणि थालिपिठाच्या फर्मास बेताने क्षुधाशांती केली जाते. काही घरांतल्या आजीबाई किंवा इतर स्त्रियाही सोमवार, शनिवारचे उपवास करतात. मग काय, घरातल्या सर्वांची चंगळच होते. कारण उपवास सोडायला वालाचे बिरडे, मुगाची चवदार आमटी, वालाची खिचडी, अळुवडी, काकडीची तवसं अशासारखे पदार्थ घरात केले जातात. व्रतवैकल्यांबरोबर काही घरांत कहाण्यांचे सूर निनादू लागतात. पावसाळी चविष्ट व आरोग्यदायी भाज्या मधूनमधून घरात डोकावतात. शाळेत श्रावणी शुक्रवार साजरा करायचा असतो, म्हणून त्या दिवशी घरातील लहान मुले नटूनथटून शाळेत जातात व तिखट चटणी घातलेले चणे खाऊन येतात. शुक्रवारी घरीही देवीला चणे व गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. वरणापुरणाची सवाशीण पुजली जाऊन तिचे आशीर्वाद घेतले जातात.

श्रावण हा सणांचा राजा असल्यामुळे घरादाराच्या अंगी श्रावण भिनलेला असतो. घरच उत्सवमूर्ती झालेले असते. श्रावणात जसा निसर्ग नटलेला असतो, तसा घरातला प्रत्येक वार व सण पदार्थांनी भरलेला असतो. नारळी पौर्णिमेला खरपूस नारळीभाताचा वास घरात दरवळतो. सासरी गेलेली लेक भावाला राखी बांधण्यासाठी घरी आलेली असते. मग तिचे कोडकौतुक करण्यात घरची मंडळी दंग असतात. स्त्रियांची माहेरी जाण्याची, सजण्या-नटण्याची हौस श्रावण महिन्यात पूर्ण होते. गोकुळ अष्टमीला घरातील बालगोपाळांची दहीहंडी बघायला किंवा खेळायला जायची घाई चाललेली असते.

या श्रावणात घर धुऊन-पुसून स्वच्छ केले जाते. देवघर जास्तच नटलेले असते. चंदन, धूप, उदबत्त्या, हार यांचा सुवास घरभर दरवळत असतो. घरात केळीच्या पानांचा मान, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोठा असतो. देवापुढे रांगोळीही आपले महत्त्व पटवून देत असते व आपल्या रंगाने सणांचे रंग आणखी खुलवत असते. श्रावणातील सणांना, हौशी लोकांच्या घराच्या दारातही रांगोळ्या असतात व दाराला तोरण मिरवत असते. श्रावणात घरात सगळीकडे एकप्रकारचे पावित्र्य वास करीत असते. सगळीकडे मंगलमय, प्रसन्न वातावरण असते. घराघरांतील श्रावणातला आनंद पूर्वीसारखाच राहिलेला आहे. असा हा श्रावण अंगात भिनतो ना भिनतो तोवर निघताना आपल्या लाडक्‍या गणपती बाप्पाच्या आगमनाची वर्दी देऊन जातो आणि घर परत त्याच्या तयारीसाठी सज्ज होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News