सोलापूर काय आहे हे उद्योजकांना दाखवून देवू; तरुणाईच्या प्रश्‍नांवर झाला "आदित्य संवाद"

परशुराम कोकणे
Wednesday, 31 July 2019
  • शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वालचंद महाविद्यालयात आदित्य संवाद कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला
  • आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाला विरोध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले

सोलापूर: शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वालचंद महाविद्यालयात आदित्य संवाद कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बेरोजगारी, नोकऱ्यांची संधी, मूलभूत सुविधा, आरोग्य, विडी कामगार महिलांच्या अडचणी, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. येणाऱ्या काळात सोलापुरात उद्योग-धंदे वाढले पाहिजेत यासाठी सोलापूर काय आहे हे उद्योजकांना दाखवून देवू असे त्यांनी यावेळी सांगितले. 

नोकरीसाठी तरुण मुले सोलापूर सोडून पुण्याला जात असल्याच्या समस्येकडे शंकर फुलारी या विद्यार्थ्याने लक्ष वेधले. त्यावर आदित्य यांनी येणाऱ्या काळात सोलापुरात उद्योग-धंदे वाढले पाहिजेत यासाठी सोलापूर काय आहे हे उद्योजकांना दाखवून देण्याचे आश्‍वासन दिले. सोलापूर आयटी हब व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

वर्षा चुंगे या विद्यार्थिनीने गावापासून शहरात कॉलेजला येण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याचे सांगितले. यावेळी सोलापूरचे सहपालकमंत्री तानाजी सावंत आणि शिवसेना नेते सचिन आहिर यांनी विद्यार्थिनींसाठी मोफत बससेवा उपलब्ध करण्याचा शब्द दिला. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडांगणावरील अडचणी नागनाथ हिंगमरे या खेळाडू विद्यार्थ्याने मांडल्या. 

शैक्षणिक फी कमी झाली पाहिजे. जात पाहून शिक्षण आणि नोकरीसाठी देणे बंद करावे अशी मागणी विद्यार्थिनीने केली. त्यावर आदित्य यांनी जातीवर पोट असतं, पोटाला जात नसते असे सांगून सकारात्मक उत्तर दिले. विडी उद्योगामुळे महिला कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाकडे एका विद्यार्थिनीने लक्ष वेधले. फी देण्यासाठी पैसे नसल्याने मोहोळमधील विद्यार्थिनी रूपाली पवार हिने केलेल्या आत्महत्येच्या घटनेची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सर्वांसमोर आणण्यासाठीच हा संवाद असल्याचे आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केले. 

गाय आणि माय दोन्हीला हात लावणाऱ्यांना चौकात कापले पाहिजे असे उत्तर आदित्य गोहत्येच्या प्रश्‍नावर दिले. स्मार्टफोन आणि इतर नव्या माध्यमांचा तरुणांनी सकारात्मक वापर करावा. गेम किंवा अन्य टाइमपास गोष्टीपासून दूर राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. 

दुसऱ्या टप्प्यातील जनआशीर्वाद यात्रेला आदित्य ठाकरे यांनी सोलापुरातून सुरवात केली. आदित्य संवाद कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाला विरोध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आदित्य संवाद कार्यक्रमानंतर ते मोहोळला रवाना झाले. 

अनेक तरुणांना आपले ध्येयच माहीत नाही. आयुष्यात पुढे काय करायचे आहे याचा त्यांनी विचारच केला नाही. तरुणांना आपले भविष्य घडविता यावे यासाठी समुपदेशन आवश्‍यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेज ऑनलाइन माध्यमातून जोडून विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याचा विचार आहे. आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, तरच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची स्थिती सुधारेल. 

- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News