सेना भाजपला म्हणते, "कोणत्या जागा हव्यात त्या सांगा"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • भाजपने त्यांना हवे असलेल्या १४ ते १८ मतदारसंघांची यादी पाठवावी, असे शिवसेनेने सुचवले
  • शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव

मुंबई : समसमान सत्ता या सूत्राचा आदर करण्याच्या आणाभाका घेत जागावाटप चर्चेला प्रारंभ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्‍चित केला असून, भाजपने त्यांना हवे असलेल्या १४ ते १८ मतदारसंघांची यादी पाठवावी, असे शिवसेनेने सुचवले आहे.

भाजपचे आज १२३ आमदार आहेत, तर शिवसेनेचे ६३. मित्रपक्षांनी निवडून येण्याची शाश्वती एक-दोन ठिकाणीच असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे शिवसेनेचे मत आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ मतदारसंघांतून लढणार, हे गृहित धरत भाजपला हव्या असलेल्या जागा कळल्या, तर वाटप सोपे होईल, असे शिवसेनेकडून कळवण्यात आले आहे. एमटीएनएलला लागलेल्या आगीमुळे ‘मातोश्री’ची दूरध्वनी सेवा बंद असली, तरी फडणवीस व उद्धव यांनी ‘फेसटाइम’मार्फत गेल्या दोन दिवसांत दोनदा संपर्क साधला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्या धरून त्यांना किती मतदारसंघ हवेत, याबाबत शिवसेनेला माहिती हवी आहे. पुणे, नागपूर या नागरी भागात शिवसेनेची ताकद नाही. भाजपने सर्व जागा जिंकल्या आहेत. त्या मागायच्या नाहीत, असा शिवसेनेचा मनसुबा आहे.

नाशिक येथे भाजपवर नाराज असलेले आमदार, तसेच ठाणे शहर या जागा मागण्याचाही शिवसेनेचा मानस आहे. आदित्य यांच्या ‘यात्रे’बद्दल भाजपने व्यक्त केलेल्या आक्षेपांवरही सविस्तर विचार झाला आहे. शिवसेनेला भाजपची बरोबरी करण्यासाठी तब्बल ६० मतदारसंघांत तयारी करायची असल्याने भाजपचे मत जाणून घेण्यास प्राधान्य आहे. दरम्यान, भाजपने या सूचनेवर विचार सुरू केला आहे. 

सोईने पक्षांतर
राजकीय वातावरण लक्षात घेता काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांकडून ‘इनकमिंग’चे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडे येत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपकडे खासदारकीसाठी आलेल्या प्रतिस्पर्ध्याला यश मिळाल्याने त्याचा स्पर्धक उमेदवार शिवसेनेत पाठवून त्याला निवडून आणायची तयारी युतीत सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी ढीगभर नेते युतीत येतील, असे विधान केले. तर, यासंबंधातील सर्व निर्णय फडणवीस आणि उद्धव ठाकरे घेणार असल्याचे ठरले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News