शिवसेना माझे घर, भगवा ध्वज गुरू : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019
 • शिवसेनेच्या वर्धापनदिनी देवेंद्र फडणवीस यांच्‍यासमवेत निर्धार
 • मुख्यमंत्री कोण हा विषय गौण
   

मुंबई : विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात ठाकरे यांनीही तितक्‍याच उमदेपणाने स्वीकारला.

विधानसभेच्या मैदानात आता ‘एकसाथ दौडू’ असे सांगत उद्धव यांनी ‘एका युतीची पुढची गोष्ट’ सुरू केली. आमची युती अभेद्य आहे; पण यापुढे सर्व समसमान हवे, असे सांगत उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असल्याचे संकेत दिले.

शिवसेनेचा ५३ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाला सुरवात केली. ‘‘मी येथे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, उद्धवजींचे प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घ्यायला आलो आहे,’’असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी करताच त्यांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

‘‘एका घरात दोन भाऊ राहत असतील, तर ताणतणाव निर्माण होताच, पण आम्ही मनाने कधीच दूर गेलो नव्हतो, सर्वाधिक काळ चाललेली ही नैसर्गिक युती आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आणि तणावही संपला. मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण आहेत, त्या चर्चा माध्यमांना करू द्या. आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही. आता आपल्यासमोर विधानसभा निवडणुकीत ‘न भूतो’ असा विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे,’’असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भाषणात लोकसभेतील विजयाचे श्रेय शिवसैनिकांना दिले. शिवसैनिक हे वेगळे रसायन आहे, त्याला लढायला सांगावे लागत नाही. ही युती भावनाधारित असून, त्यामध्ये स्वार्थाला थारा नाही. उत्तर प्रदेशात झालेली स्वार्थावर आधारित युती निकालानंतर संपुष्टात आली.

आमचे तसे नाही. जे मतभेद होते ते मुख्यमंत्री आणि अमित शहांनी पुढाकार घेऊन संपुष्टात आणले. युती आता अभेद्य असून, आमचेही आता ठरले आहे. फडणवीस हे माझे वैयक्तिक चांगले मित्र असून, त्यामुळेच त्यांना मी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता ते स्वीकारल्याचे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव म्हणाले...

 • सावरकरांना डरपोक म्हणणारे पराभूत झाले
 • ओवैसी यांचा वंदे मातरमला आक्षेप का?
 • भाजपचे विजयी खासदार मलाही भेटले
 • युतीचे व्यासपीठ हे अवघा महाराष्ट्र
 • आता मी शेतकऱ्यांमध्ये जाणार
   

मुख्यमंत्री म्हणाले...

 • शिवसेना माझे घर, भगवा ध्वज गुरू
 • आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
 • शिवसेना वर्धिष्णू व्हावी, हीच शुभेच्छा
 • आता दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी काम 
 • वाघ-सिंह एकत्र आले, जनतेचा कौल आम्हाला
   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News