शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी म्हणून शिवसेनेची थेट मोदींकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

शिवसेनेच्या सूचना

  • पीक विमा योजना ऐच्छिक असावी
  • आणेवारी पद्धतीमध्ये सुधारणा करावी
  • योजनेच्या आढाव्यासाठी गाव हा घटक मानावा
  • तालुका पातळीवर विमा कंपन्यांचे कार्यालय हवे 
  • जोखीम स्तर ७० ऐवजी ९० टक्के मानावा

नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील त्रुटींकडे शिवसेनेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेची रक्कम मिळावी, त्याचप्रमाणे पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीय बॅंकांना चाप लावावा, अशी मागणी केली आहे. 

शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने संसदीय पक्षनेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाच्या परिसरात मोदींची भेट घेऊन निवेदन दिले. पीक विमा योजनेचा प्रीमियम सक्तीने कापून घेतला जात असला तरी, भरपाई मात्र शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. महाराष्ट्रात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स, इफको-टोकिओ जनरल इन्शुरन्स आणि अन्य विमा कंपन्यांकडून मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यात चालढकल केली जात आहे.

विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना अधिक होत असल्याचे पंतप्रधानांना निदर्शनास आणून दिले, असे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टिकोन अतिशय निषेधार्ह असून, या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या मुंबईतील मुख्यालयांवर मोर्चाही काढला होता. 

विमा कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विम्यापोटी ४७७८.३३ कोटी रुपये जमा झाले, तर फक्त ५२.३५ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. विमा कंपन्यांकडे ४७३१.४७ कोटी रुपये रक्कम जमा आहे. यावरून विमा कंपन्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे लुटत आहेत, हे स्पष्ट होते, याकडे पंतप्रधानांचे शिवसेना शिष्टमंडळाने लक्ष वेधले. तसेच पीक विमा योजनेमध्ये दुरुस्त्याही सुचविल्या. 

खासदार प्रतापराव जाधव यांनी या सूचनांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. आतापर्यंत राज्यात फक्त ११ टक्के शेतकऱ्यांनाच राष्ट्रीय कृत बॅंकांनी कर्ज दिले आहे. ८९ टक्के शेतकरी वंचित आहेत, यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही जाधव यांनी केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News