तिने ब्रेक मारला आणि...

अभिनव बसवर
Thursday, 13 June 2019

मी मुद्दामून सायकलची चेन पाडली आणि तसाच तिच्याकडे पाहत राहिलो. गो-या गो-या चेहऱ्यावर तिच्या नकाचा शेंडा तेवढा लाल झालेला. तोंडातून शब्दच निघेना. तिने डोळे मोठे करून माझ्याकडे पहिलं. सायकलवरून खाली उतरुन ताड ताड पाऊले टाकत माझ्या दिशेने आली आणि.....

आदल्यादिवशी रेनकोट शाळेतच विसरून आलो. सकाळ, संध्याकाळ पावसाची रिपरिप मात्र चालूच. थोडा वेळ पाऊस उघडतोय का पाहिलं. शेवटी एका हातात छत्री घेतली, दुसऱ्या हाताने हँडल पकडलं आणि पॅंडलवर पाय मारून निघालो.

बरोबर पाऊने सात वाजता ति सायकलवर चौकातून पास व्हायची. मी त्याआधीच चौकात जाऊन थांबायचो. चिखलाच्या पाण्याने माझे दोन्ही शूज राड झालेले तर एका बाजूने खालपासून वरपर्यंत पूर्ण भिजलेलो. गाल आणि नाक पूर्ण गारठून गेलेले. 

आज तिला उशीर झालेला. शेवटी सातला पाच कमी असताना ती चौकात आली. आम्ही दोघे एकाच वर्गात पण तिने मला आजपर्यंत कधीच ओळख दिली नव्हती. ती आलेली बघून मी उगाच सायकलची चेन बघत खाली बसलो. एका हातात छत्री तशीच. 

तिने ब्रेक मारला आणि माझ्या अगदीच समोर येऊन थांबली. मी अजूनच गारठून गेलो. माझ्या भिजलेल्या दप्तराकडे पाहत म्हणाली, "आण ते इकडे." बाजूच्या दुकानाच्या शेडखाली थांबून त्यातील वह्या पुस्तके तिने स्वतःच्या दप्तरामध्ये टाकली आणि रेनकोटच्या आतमध्ये पाठीला दप्तर अडकवलं. मला रिकामं दप्तर देत म्हणाली, "चल आता लवकर, आधीच उशीर झालाय."

मी मुद्दामून सायकलची चेन पाडली आणि तसाच तिच्याकडे पाहत राहिलो. गो-या गो-या चेहऱ्यावर तिच्या नकाचा शेंडा तेवढा लाल झालेला. तोंडातून शब्दच निघेना. तिने डोळे मोठे करून माझ्याकडे पहिलं. सायकलवरून खाली उतरुन ताड ताड पाऊले टाकत माझ्या दिशेने आली आणि म्हणाली "तुझी सायकल तिकडे दुकानाच्या बाजूला ठेव आणि चल लवकर अरे".

माझ्या हातातील छत्री तिने तिच्या हातात घेतली. मागे कँरियरवर एका बाजूला दोन्ही पाय सोडून ती बसली. माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि आम्ही निघालो. मध्येच वाऱ्याने छत्री बाजूला व्हायची आणि तोंडावर पावसाच्या धारांचा जोरात तडाखा बसायचा पण मला कशाचीच फिकीर नव्हती कारण "पहला पहला प्यार था, पहली पहली बार था..''

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News