शाहूराज नामदेवराव जाधव : हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेतृत्त्व

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 11 November 2019

शाहूराज नामदेवराव जाधव यांचा जन्म २ जून १९२६ रोजी नाईचाकूर येथील शेतकरी कुटुंबात झाला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाने वेग घेतला त्याच बरोबर मराठी भूमीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी चळवळींना वेग आला. संबंध दक्षिणेमध्ये विशेषतः हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक जिल्हे उस्मानाबाद (आताचे उस्मानाबाद व लातूर) व बिदर या भागात या चळवळींचा जास्त प्रभाव झाला. हैदराबाद संस्थानात त्याचवेळी हैदराबाद स्टेट काँग्रेस ही संस्था हैदराबाद मुक्ती आंदोलन चालवणारी संस्था म्हणून स्थापन झाली.

शाहूराज नामदेवराव जाधव यांचा जन्म २ जून १९२६ रोजी नाईचाकूर येथील शेतकरी कुटुंबात झाला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाने वेग घेतला त्याच बरोबर मराठी भूमीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी चळवळींना वेग आला. संबंध दक्षिणेमध्ये विशेषतः हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक जिल्हे उस्मानाबाद (आताचे उस्मानाबाद व लातूर) व बिदर या भागात या चळवळींचा जास्त प्रभाव झाला. हैदराबाद संस्थानात त्याचवेळी हैदराबाद स्टेट काँग्रेस ही संस्था हैदराबाद मुक्ती आंदोलन चालवणारी संस्था म्हणून स्थापन झाली. निजामाने सादर संस्थेवर बंदी घातली तरी महाराष्ट्र परिषद, कर्नाटक परिषद, व आंध्र परिषद या संघनात्मक नावानी स्वातंत्र्य चळवळ आणि जन जागृती चालू राहिली. त्या काळात महाराष्ट्र परिषदेचे प्रचंड अधिवेशन आनंदकृष्ण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्या वेळी गोविंद एकनाथ पवार व शाहूराज नामदेवराव जाधव लातूर येथे नोकरीच्या शोधात होते. ते या अधिवेशनात सहभागी झाले आणि त्यातून प्रेरित होऊन निझाम सरकारच्या विरोधात जन जागृती करू लागले.

निझामी गुप्तहेरांच्या रिपोर्ट नुसार निझामी पोलीस त्यांचा शोध  घेऊ लागले. शाहूराज जाधव हे त्यावेळी लातूर येथे बंकटलाल धूत मारवाडी यांच्याकडे मुनीम म्हणून काम करत होते. त्यावेळचे नाईचाकुर पोलीस ठाण्याचे फ़ौजदार अमीनसाहेब यांच्या धमकीमुळे धूत यांनी शाहूराज जाधव यांना कामावरून काढून टाकले. गोविंद पवार हे मास्तर होते त्यांनापण नोकरीवरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर शुंहुराज जाधव, गोविंद पवार, नामराव जमालपुरे, जयपाल काक्रंबे, राम तांबटकर, राम उबाळे, टेलर राम माने, व्यंकट सोनार किल्लारीकर यांच्यावर उमरगा व नळदुर्ग कोर्टामध्ये खटले भरले गेले. वर्षभर तारखा कराव्या लागल्या त्यानंतर तेथून फरार होऊन पुण्याला गेले, तेथे त्यांना क्रांती सिंह नाना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी हैदराबाद मुक्ती संग्रामात झोकून देण्याचे ठरवले व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सूचनेनुसार मौ. कुंडल जि. सांगली येथे प्रशिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी शारीरिक प्रशिक्षण तसेच सैनिकी व राजकीय डावपेचाचे धडे घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या भागात जाऊन चळवळीचे काम करायचे ठरवले आणि उमरगा येथे परतले.

उमरगा येथे त्यांनी रात्री स्थानिक साथीदारांसोबत बैठक घेतली त्यात पोतदार वकील, तात्याराव मोरे, विश्वनाथ गायकवाड, नानाराव पाटील आदी हजार होते. बैठकीत त्यांना सांगण्यात आले कि सरकारकडे त्यांच्याबद्दल गुप्त रिपोर्ट असून खटले चालू असल्याने वॉरंट जारी केला आहे तरी तुम्हाला कधीही अटक होऊ शकते. इथे काम करणे अवघड जाईल असा विचार करून त्यांनी आपल्या काही साथीदारांसोबत परत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सोबत काम चालू केले. १६ ते १८ जून १९४७ ला हैदराबाद येथे हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अधिवेशन पु. रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यात शुंहुराज जाधव व त्यांचे सहकारी हजर होते, या अधिवेशनात हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर गावोगावी जाऊन याविषयी जनजागृती सुरु करण्यात आली.

शाहूराज जाधव यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आदर्श पुढे ठेवून लढ्याचे कार्य भूमिगत राहून सुरु केले. गावोगावी गुप्त मिटींग घेऊन करोडगिरी नाके उडवणे, तारबंदी करणे, रसद लुटणे निझाम सरकारची सत्ता चालविणारे अधिकारी पाटील, कुलकर्णी यांची कामे बंद करणे, तसेच निझाम सरकारचे आर्थिक नुकसान करणे, शिंदी वनाची झाडे तोडणे इत्यादी निझाम विरोधी कामे चालू केली. शाहूराज जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बऱ्याच गावांमधून शस्त्रास्त्रे जमवून त्यांचा वापर निझाम विरोधी कारवायांसाठी केला. तुगाव हालसी (जि. बिदर) इथून रायफली, सरवडीचे नर्सिंग ढोर, माडजचे बाबाराव माने यांच्याकडून बंदुका व तालवारी, भाले, बर्ची, हरिजवळगा येथून लिंबाजी शामराव हाडोळे यांच्याकडून बंदुका, नदी हत्तरगा येथून नागोराव मास्तर यांच्याकडून हात बॉम्ब इत्यादी हत्यारे जमा केली. यांचा वापर करून सहकाऱ्यांच्या मदतीने हराळी, हाडोळी, नेलवाड येथील सारा व लेव्हीची रक्कम लुटली. माडज, किल्लारी, हरिजवळगा, भूतमुगळी, दादगी, लिंबाळा, कवठा, सरवडी परिसरात रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी अबकारी केंद्रांवर हल्ले करून रकमा लुटणे, दारूचे अड्डे नष्ट करणे आदी कारवाया केल्या.

यापुढील कारवायांसाठी चांगल्या हत्यारांची आवश्यकता होती, त्यासाठी चाकूरच्या आंबाईच्या डोंगरात प्रमुख साथीदारांची गुप्त मिटींग घेऊन आपल्या भागातील मोठे असलेल्या नाईचाकूर पोलीस ठाण्यावर हल्ला करून लुटण्याचे व ते नष्ट करण्याची योजना आखली. सादर योजना आखण्यामध्ये शाहूराज जाधव, गोविंद पवार, रामराव गायकवाड, सदानंद सुतार, नरसिंगराव मास्तर, नामदेव पवार, नामराव जमालपुरे, राम उबाळे, जयपाल कांबळे, माणिक देवराव पवार, धोंडीराम सोनवणे, व्यंकट सोळुंके, किसन राजपूत, माणिक सगर, राम माने आदींचा सहभाग होता.  

योजनेप्रमाणे दिनांक १५ व १६ जानेवारी १९४८ च्या मध्य रात्री चाकूर ठाण्यावर तीन बाजूनी हल्ला करण्यात आला, या हल्ल्याची जबाबदारी व नेतृत्व गोविंद पवार व शाहूराज यांच्याकडे होते. फौजदारांच्या घराभोवती वेढा देण्याची जबाबदारी राम तांबटकर, सदानंद सुतार, लिंबाजीराव हाडोळे आदींकडे होती. शाहूराज जाधव व गोविंद पवार यांनी पहारा देणाऱ्या शिपायांवर गोळी झाडली, त्या आवाजाने इतर पहारेकरी घाबरून पळून गेले. इतर साथीदारांनी ठाण्यातून हत्यार बाहेर काढले व ठाण्याची इमारत, त्यातील कागपत्रे, व जिवंत काडतुसांना आग लावली. त्यानंतर सर्व तुकड्या ठरल्याप्रमाणे नियोजित ठिकाणी म्हणजे चाकूरच्या पश्चिम माळावर येऊन जमा झाले. शाहूराज जाधव व गोविंद पवार यांनी लुटलेली हत्यारे सुरक्षित ठेवण्याची योजना बनवली त्यानुसार हत्यारे मुदगडचे शंकर कुंभार व रामराव गायकवाड, हरिजवळगा येथील लिंबाजी शामराव हाडोळे, तर काही हत्यारे राम उबाळे यांच्या वाड्यात सुरक्षित ठेवण्यात आली. या कारवाईत ४५ शासस्त्र सैनिकांनी भाग घेतला होता. या कारवाईमुळे शाहूराज जाधव व सहकाऱ्यांवर उमरगा, नळदुर्ग येथील कोर्ट व उस्मानाबाद सेशन कोर्ट यांत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले व पोलिसांचा ससेमिरा आणखी वाढला.

लपवून ठेवलेली हत्यारे केसर जवळगा मार्गे वागदरी (जि. सोलापूर) येथील निर्वासित कॅम्पमधे नेण्याची योजना सहकाऱ्यांसोबत आखली. केसर जवळगा मार्गे जाताना तेथील पोलीस पाटील व काँग्रेस नेते मार्तंडराव डांगे यांनी सर्वाना आसरा दिला. वागदरी येथे आल्यानंतर निर्वासित कॅम्पचे रूपांतर लढाऊ सैनिकी कॅम्पमधे केले. सोलापूर येथील फुलचंद गांधी, विश्वंभर हराळकर, कॅप्टन जोशी, नागनाथराव चिंचोलीकर यांनी स्टेट काँग्रेस ऑफिस मार्फत मदत मिळवून दिली.  

वागदरी कॅम्पचे व्यवस्थापन व कार्य :
१. कॅम्प प्रमुख - अण्णाराव वीरभद्र पाटील (आळंद)
२. कॅम्प उपप्रमुख व कोषाध्यक्ष - शाहूराज नामदेवराव जाधव (नाईचाकूर)
३. रेड हल्ले प्रमुख - गोविंद एकनाथ पवार (नाईचाकूर)
४. कॅम्प चालक, सेक्रेटरी, रेकॉर्ड कीपर - गुंडप्पा मुरूमकर गुरुजी
५. परेड, सैनिकी शिक्षण - कोनेकर गुरुजी, विश्वंभर यादव, संदीकर गुरुजी, अनंत विष्णू तानेकर
६. दारुगोळा व हत्यारे दुरुस्ती - शिवाजी रणखांब
७. सल्लागार प्रमुख - गुरुनाथ ढगे (आळंद)
८. कॅम्प कालावधी - १५ डिसेंबर १९४७ ते १३ सप्टेंबर १९४८. सैनिकी कॅम्प मध्ये रूपान्तर जानेवारी १९४८.
९.  कॅम्प मधील सैनिकांची संख्या - ४५
१०. कॅम्पने केलेली प्रमुख कामे - घातपाती चळवळ, निराश्रितांना संरक्षण, निझामाविरुद्ध अशांतता निर्माण करणे, पोलीस ठाणे उद्ध्वस्त करणे, रझाकाराला प्रत्युत्तर देणे आदी.
११. कारवायांचे प्रमुख - शाहूराज नामदेवराव जाधव (नाईचाकूर), गोविंद एकनाथ पवार (नाईचाकूर), राम माधवराव गायकवाड (माडज)
१२. कॅम्प मधील हत्यारांची यादी - स्टेन गन, रिव्हॉल्वर, बर्चे, बंदुका, भाले, तलवारी, आदी.
१३. ठळक घातपाती कारवायांची यादी - १. नंदगाव (वागदरी जवळ) येथील रझाकाराचे ठाणे उध्वस्त केले. २. एकूण ३७ रझाकार ठार केले. ३. महादेवअप्पा पुजारी, शंकर शामराव जाधव आदींनी रझाकारांच्या हिरोळी (आळंद) पोलीस ठाण्यावर हल्ला केला. ४. अण्णाराव पाटील आदींनी सरसंबा (आळंद) पोलीस ठाणे उध्वस्त केले. ५. शाहूराज जाधव, गोविंद पवार आदींनी नाईचाकूर पोलीस ठाणे उध्वस्त करून हत्यारे लुटली. ६. गोविंद पवार आदींनी सरवडी (ता. निलंगा) येथे रझाकारांच्या मुकाबला केला. ७. निवास व गोपाळ मुगळीकर यांनी खून केला. ८. शाहूराज जाधव, गोविंद पवार आदींनी कुख्यात गुंड इस्माईल मेहबूब मुल्ला याचा खात्मा केला.    

शाहूराज जाधव यांनी पुढील काळात तालुका व जिल्हा स्तरावरील अनेक पदांवर काम केले. १९५० साली उमरगा विकास मंडळाचे सदस्य झाले, १९५५ साली उस्मानाबाद जिल्हा विकास मंडळाचे सदस्य झाले त्याद्वारे कित्येक गावांमध्ये पतपेढ्या स्थापन केल्या, शेतकऱ्यांना विहिरींकरिता साहाय्य व पिकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या, कर्ज मिळवून दिले, ऊस लागवड असलेल्या परिसरात ग्राम उद्योग तर्फे गुळखांडसरी चालू केल्या. नाईचाकूर येथे चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा चालू केली, पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी अशोक विद्यालय शिक्षण संस्था स्थापन केली. अनेक वर्ष तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा गौरव समिती सदस्य म्हणून देखील काम केले.  

शाहूराज जाधव याना स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल १५ ऑगस्ट १९७२ रोजी भारत सरकारतर्फे ताम्र पत्र प्रदान करण्यात आले, व ६ सप्टेंबर १९८९ रोजी महाराष्ट्र सरकार तर्फे मरणोत्तर सन्मान पत्र देण्यात आले. अखेर दिनांक ११ नोव्हेंबर १९८४ (२०४० विक्रम संवत कार्तिक कृ. ३) रोजी शाहूराज जाधव कैलासवासी झाले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News