जगायला शिकवणारी सीरिज, आणि काय हवं?....

विशाखा टिकले पंडित
Saturday, 10 August 2019
  • सीरिज नुकतीच एमएक्‍स प्लेअरवर प्रदर्शित
  • दैनंदिन जीवनात येणारे साधेसुधे प्रसंग
  • चौथ्या भागात छोट्या सुट्टीचं प्लानिंग
  • सीरिजची आणखी एक जमेची बाजू म्हणजे संवाद

कुठलंही नाट्य नसलं तरीही साकेत जुईची कथा का आवडते, याचं कारण म्हणजे ती आपल्या आसपास घडताना दिसते. दैनंदिन जीवनात येणारे साधेसुधे प्रसंग पाहायला प्रेक्षकांना आवडतं. या हलक्‍या फुलक्‍या क्षणांसाठी ही सीरिज पाहायला हवी.

आयुष्यातल्या हलक्‍या-फुलक्‍या क्षणांना भरभरून जगायला शिकवणारी एक टवटवीत सीरिज नुकतीच एमएक्‍स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. ‘आणि काय हवं?’ ही पाच भागांची एक छोटीशी सीरिज आहे. ही सीरिज त्याच्या सादरीकरणासाठी आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयासाठी पाहायला हवी.

साकेत आणि जुई ( उमेश कामत, प्रिया बापट) हे दोन वर्षांपूर्वी लग्न झालेलं जोडपं. या जोडप्याच्या  रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या सीरिजमध्ये दाखवल्या आहेत. पहिल्या भागात नवं घर आणि त्याची सजावट, दुसऱ्या भागात नवी गाडी घेण्याचा आनंद, तिसऱ्या भागात पुरणपोळी करणारी जुई, चौथ्या भागात छोट्या सुट्टीचं प्लानिंग; तर पाचव्या भागात जुन्या आठवणीतून मन मोकळं करणारे साकेत आणि जुई आपल्याला भेटतात.

कोणत्याही तरुण जोडप्याच्या आयुष्यात येणारे हसरे खेळकर क्षण या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. त्यात प्रेम आहे, लटका राग आहे, खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि धमाल मस्ती आहे.

कुठलंही नाट्य नसलं, तरीही साकेत-जुईची कथा का आवडते, याचं कारण म्हणजे आपल्या आसपास ती घडताना दिसते. दैनंदिन जीवनात येणारे साधेसुधे प्रसंग प्रत्येकाने अनुभवलेले असतात आणि  तेच आपल्याला समोर पाहायला मिळतात. 

या सीरिजची आणखी एक जमेची बाजू म्हणजे संवाद. आजकाल सिनेमा आणि मालिकांमध्ये संवाद म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञानांचा ओव्हरडोस असतो. कधी कधी संवाद म्हणजे लांबलचक भाषणंच असतात. या सीरिजमधील संवाद खूप सहजतेने येतात. गरज असेल तितकेच आणि साधे सोपे. 

सीरिजच्या सुरुवातीचे दोन भाग विनाकारण खेचल्यासारखे वाटतात. त्यातले संवादही काही वेळाने एकसुरी व्हायला लागतात; मात्र तिसऱ्या भागापासून सीरिज पकड घ्यायला लागते. पुरणपोळीच्या भागाचा शेवट तर धमाल आणतो आणि इथूनच सीरिज पाहावीशी वाटू लागते.  शेवटचे दोन भाग जास्त चांगले झालेत.

सतत कामाच्या गराड्यात सापडलेली, लग्नानंतर दोन वर्षांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकर, प्रेयसीविषयी मोकळेपणाने बोलून टाकणारी, एकमेकांना सहज समजून घेणारी आजची तरुणाई यात पाहायला मिळते.  ही सीरिज आणखी एका गोष्टीसाठी पाहावी ती म्हणजे उमेश आणि प्रियाच्या उत्कृष्ट केमिस्ट्रीसाठी.

साकेत आणि जुईचं विश्व त्यांनी खूप छान साकारलंय. एकंदरीतच सीरिअल, सिनेमाच्या धर्तीवर बनणाऱ्या भपकेबाज वेबसीरिजच्या गराड्यात, छान, हलकंफुलकं मनोरंजन हवं असेल तर ही सीरिज एक चांगला चॉईस आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News