औरंगाबादेत मनपाच्या शाळांत सेमी इंग्रजीची सुविधा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळा तग धरून असून, यंदा पाच शाळेत नवीन वर्ग, तर पाच शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू झाले आहेत.

औरंगाबाद - खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळा तग धरून असून, यंदा पाच शाळेत नवीन वर्ग, तर पाच शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू झाले आहेत. महापालिकेच्या शहरात मराठी व उर्दू माध्यमाच्या ७२ शाळा आहेत. त्यात १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. 

यंदा पाच शाळांत नवीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पडेगाव शाळेत वर्ग आठवी, आरेफ कॉलनी येथे सहावी, ज्युबली पार्क येथे आठवी, सिल्कमिल्क कॉलनी येथे दहावी, सिल्लेखाना येथे पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. आरेफ कॉलनी, ज्युबली पार्क, पडेगाव, चेलीपुरा-शहाबाजार, गणेश कॉलनी या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

 ११ हजार विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी प्रत्येकी ६०० रुपये, असे ६६ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिल्या फेरीत १७०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, कार्यक्रमाधिकारी दत्ता सांगळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  

शिक्षकांची ५१ रिक्त पदे
महापालिकेत ४६० शिक्षकांची पदे मंजूर आहेत, तर ४०९ शिक्षक कार्यरत आहेत. ५१ शिक्षकांची पदे रिक्त असून, ३० शिक्षकांची पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चार उर्दू व नऊ मराठी माध्यमातील आणि १३ आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना घेण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News