३७० वे कलम रद्द ! देशभरात जल्लोष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

नवी दिल्ली : ऐतिहासिक कौल देत राज्यसभेने जम्मू आणि काश्‍मीर फेररचना विधेयक आज बहुमताने मंजूर केले. त्याचबरोबर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० ही (त्यातील पहिले उपकलम वगळून) रद्द करण्यात आले. या विधेयकामुळे जम्मू-काश्‍मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. यापैकी जम्मू-काश्‍मीरला विधानसभा असेल; तर लडाख हा चंडिगडप्रमाणे केंद्राच्या अखत्यारीत राहील. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार असून, तेथे ते मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

नवी दिल्ली : ऐतिहासिक कौल देत राज्यसभेने जम्मू आणि काश्‍मीर फेररचना विधेयक आज बहुमताने मंजूर केले. त्याचबरोबर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० ही (त्यातील पहिले उपकलम वगळून) रद्द करण्यात आले. या विधेयकामुळे जम्मू-काश्‍मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. यापैकी जम्मू-काश्‍मीरला विधानसभा असेल; तर लडाख हा चंडिगडप्रमाणे केंद्राच्या अखत्यारीत राहील. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार असून, तेथे ते मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

चिठ्ठ्यांद्वारे झालेल्या अंतिम मतविभाजनात सरकारच्या बाजूने १२५; तर विरोधात ६१ मते पडली. सभागृहातील एका सदस्याने मतदान केले नाही. राज्यसभेने आजच मंजूर केलेल्या दुसऱ्या एका विधेयकामुळे जम्मू-काश्‍मीरमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना १० टक्के आरक्षणाचा मार्गही मोकळा झाला आहे.

जम्मू-काश्‍मीरविषयक मोठा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केला जात होता. त्यातच तेथे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या पाठविण्यात आल्याने चर्चांना उधाण आले होते. काल रात्री जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले; तसेच राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली होती. आज सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे आणि जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यानंतर दुपारी त्यांनी फेररचना विधेयक मांडले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘‘हे कलम रद्द झाल्याने विशेषतः काश्‍मीरसाठी विकासाची नवी दारे उघडतील. याबाबत काश्‍मिरातील युवकांना मी आश्वस्त करू इच्छितो. आगामी पाच वर्षांत जम्मू-काश्‍मीर देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे राज्य बनेल.’’ 

मेहबूबा आणि उमर अब्दुल्ला अटकेत
श्रीनगर : पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, जम्मू-काश्‍मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांना आज रात्री अटक करण्यात आली. राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळू नये, म्हणून या नेत्यांना पोलिसांनी अटक केली. 

‘एलओसी’वर लष्कर दक्ष
नवी दिल्ली : कलम ३७० केंद्राने रद्द केल्यानंतर प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलओसी) लष्कराला अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला. या निर्णयामुळे संतापलेल्या पाकिस्तानकडून काश्‍मीर खोऱ्यात स्फोट किंवा फिदायीन हल्ल्यांची शक्‍यता असल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या देशांना माहिती
नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करण्याबाबतची माहिती केंद्रातर्फे आज महत्त्वाच्या देशांना देण्यात आली. हा भारताचा अंतर्गत निर्णय असून, जम्मू-काश्‍मिरातील प्रशासन कार्यक्षम करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी हा निर्णय घेतल्याचेही सरकारने या देशांना स्पष्ट सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News