घरासमोरच्या लाल बाटलीमागचं रहस्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019

लाल पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये कुत्र्याला स्वतःचे प्रतिबिंब मोठ्या आकारात दिसते. बहिर्वक्र आरशाप्रमाणे ही बाटली काम करत असते. कुत्र्याची नजर या ठिकाणी आली असता कुत्र्याला आपल्यापेक्षा मोठ्या आकाराचा प्राणी दिसत असल्याने तो घाबरून त्या ठिकाणावरून पळून जातो.

महाड: मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने महाड तालुक्‍यातील नागरिक हैराण झाले आहेत. रात्री तर त्यांचा उपद्रव अधिक असतो. त्यावर मात करण्यासाठी नागरिक विविध युक्‍त्या शोधत आहेत. त्यामध्ये आता घरासमोर किंवा कुत्र्यांचा उपद्रव असलेल्या परिसरात लाल पाण्याने भरलेली बाटली ठेवण्याची युक्ती अधिक प्रसारित झाली आहे.

उरण, पनवेल तालुक्‍यात काही वर्षांपासून ही पद्धत वापरण्यात येत आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी महाड तालुक्‍यात अधिक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगार तर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. इमारतींच्या पार्किंगमध्ये या कुत्र्यांचे वास्तव्य असते. त्याचा फटकाही नागरिकांना बसला आहे.

रात्री कुत्रे अंगावर येतात, अशा तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. मुलांना या कुत्र्यांचा उपद्रव होत असतो. महाड नगरपालिकेने कुत्रे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला असतानाही ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या क्‍लृप्त्या शोधू लागले आहेत. त्यातूनच घरे, इमारतीमध्ये कुत्रे येऊ नये त्यासाठी लाल पाण्याने भरलेल्या प्लास्टिक, काचेच्या ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे शहरे आणि गावांमध्ये अशा बाटल्या दिसत आहेत.

उरण, पनवेल तालुक्‍यातील नागरिक भटक्‍या कुत्र्यांना दूर ठेवण्यासाठी काही वर्षांपासून अशा प्रकारच्या बाटल्या घरासमोर ठेवत होते. आता हे लोण दक्षिण रायगडमध्ये पोहचले आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

बाटलीतील लाल पाणी आणि कुत्र्यांचा उपद्रव याबाबत समाजात फारशी माहिती नसली, तरी त्यामागे शास्त्रीय कारण आहे. लाल पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये कुत्र्याला स्वतःचे प्रतिबिंब मोठ्या आकारात दिसते. बहिर्वक्र आरशाप्रमाणे ही बाटली काम करत असते. कुत्र्याची नजर या ठिकाणी आली असता कुत्र्याला आपल्यापेक्षा मोठ्या आकाराचा प्राणी दिसत असल्याने तो घाबरून त्या ठिकाणावरून पळून जातो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News