विज्ञान रंजक पद्धतीनं शिकवता येतं!

शिवराज गोर्ले
Thursday, 27 June 2019

बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा असावा.

बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा असावा.

गणिताच्या तासाला मुलांनी कोडी सोडवायची किंवा गणितज्ञांबद्दलचे किस्से ऐकायचे, या तासांचा अभ्यासक्रमाशी काही संबंध नसेल. कोडी परीक्षेत विचारली जाणार नाहीत. विज्ञानाच्या तासाला ‘असं का?’ अशा प्रश्‍नांची उत्तर शोधायची. शिक्षकाला माहिती नसेल तर ते प्रांजळपणे मान्य करून आठवडाभरानं शोधून यायचं. विद्यार्थी इंटरनेटवरून उत्तर मिळवू शकतो. शिक्षकानं असं विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत करायला हवं.

स्वाभाविक जिज्ञासेला उत्तेजन द्यायला हवं.‘काही झालं तरी पाठांतर हा विज्ञान शिकण्याचा मार्ग नव्हे,’ हे स्पष्ट करताना डॉ. नारळीकर यांनी शाळांमधल्या ‘विज्ञान प्रदर्शनां’संदर्भातही एक महत्त्वाचं निरीक्षण मांडलं आहे. ते म्हणतात, ‘‘अशा प्रदर्शनात एखाद्या प्रतिकृती जवळची मुलं, ‘हे काय आहे,’ असं विचारलं की पोपटासारखे शिक्षकांनी पढवून ठेवलेलं ‘वर्णन’ सांगतात. त्या संदर्भात एखादा सोपाच प्रश्‍न विचारला, तर मात्र त्यांना उत्तर देता येत नाही. कारण बहुधा ती प्रतिकृती त्यांना शिक्षकांनी सांगितल्याबरहुकूम बनवलेली असते. त्यामागे स्वयंस्फूर्तता नसते. अरविंद गुप्ता यांची ‘वैज्ञानिक खेळणी’ हा तर अत्यंत स्वस्त व मस्त पर्याय आहे. पाठ्यपुस्तकातली वाक्‍यं तोंडपाठ करून मुलं परीक्षेत मार्क मिळवतात. पण तो सिद्धांत नेमका कळत नाही. वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित खेळणी स्वतः बनवून विद्यार्थी त्या सिद्धान्तांचं प्रात्यक्षिक अनुभवू शकतात. हेच खरं शिकणं असतं.’’

‘‘विज्ञान हा विषय अवघड आहे, हा पूर्णतः गैरसमज आहे. ते अगदी रंजक पद्धतीनं मांडता येतं. सोपं करून सांगता येतं. फक्त थिअरीवर भर देण्यापेक्षा प्रात्यक्षिकांवर भर द्यायला हवा. ‘पाऊस इतका मिलिमीटर पडला,’ असं शिकण्यापेक्षा रेनगेज द्या मुलांना. पाऊस सुरू असताना त्यांनाच मोजू द्या. मुलांना झाडं लावू द्या. झाडं कशी वाढतात हे पाहू त्यांना. त्याच मोजमाप ठेवू द्या. मुलांना साधी स्वतःची उंची मोजत राहायला सांगितलं तरी त्यांना वाद म्हणजे काय हे नेमकं समजेल. या पद्धतीनं विज्ञान शिकवलं गेलं, तर ते अजिबात अवघड नाही."
 - डॉ हेमचंद्र प्रधान

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News