शालेय पोषणाच्या पूरक आहाराची देयके रखडली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 October 2019
  • जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय पोषण आहारासह पूरक आहाराची देयके रखडली आहेत. जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध असूनही प्रशासन या बाबीची जबाबदारी ढकलत काणाडोळा करीत आहे.

औरंगाबाद - जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय पोषण आहारासह पूरक आहाराची देयके रखडली आहेत. जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध असूनही प्रशासन या बाबीची जबाबदारी ढकलत काणाडोळा करीत आहे. दिवाळी आली तरी रक्कम न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरक आहाराची देयके त्वरित वाटप करावीत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीद्वारे शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. 

दुष्काळग्रस्त भागात पूरक आहार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अंडी, दूध, फळे देण्यात येतात. शासनादेशानुसार मुख्याध्यापक स्वखर्चातून योजनेची अंमलबजावणी करत आहेत.  ऑगस्टपासून पूरक आहार देणे सुरू आहे. प्रशासनाकडून या योजनेचा निधी आल्याचे सांगण्यात आले. मात्र गेल्या दोन महिन्यांची बिले सादर करूनही अद्याप खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे मुख्याध्यापक आर्थिक अडचणीत आले आहेत. धान्य, इंधन, भाजीपाला, बचतगट मानधन, स्वयंपाकी मदतनीस मानधन या बाबींची देयके अद्यापही प्रलंबितच आहेत. 

यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून ती दूर करण्यासाठी शालेय पोषण आहाराची देयकेदेखील दरमहा निकाली काढण्यात यावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धिप्रमुख राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, बळीराम भुमरे, कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण, हारुण शेख, प्रवीण पांडे, प्रशांत हिवर्डे, दिलीप साखळे, संजय भुमे, किशोर पळसकर, कडुबा हारदे, विलास गोलांडे, संजय बागूल, राहुल मांडे, संदीप शिरकुले, सागर घोणशेट्टे, सुनील साळवे, योगेश शिसोदे, सागर पालोदकर, कारभारी वरकड, विनोद जाधव, योगेश खरात, बाबासाहेब जाधव, गणेश पगारे, बाळासाहेब मस्के आदींची नावे आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News