मराठवाड्यात ‘शाळा बंद’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 27 August 2019
  • औरंगाबादेत शंभर टक्के बंद : तातडीने अनुदान देण्याची मागणी

औरंगाबाद: आचारसंहितेपूर्वी शासनाने विनाअनुदानित शाळांना अनुदानित घोषित करून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी विनाअनुदानित आणि अनुदानित संस्थाचालकांनी पुढाकार घेऊन औरंगाबादसह जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारी (ता. २६) बंद ठेवल्या. दरम्यान, या आंदोलनाला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलन करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदानित संस्थाचालकांसह अनेक शिक्षक संघटनांनी सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक शैक्षणिक बंदची हाक दिली होती. या शाळा बंदला मराठवाड्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला; तर औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के शाळा बंद होत्या.

त्यामध्ये मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतील सुमारे आठ हजार, तर औरंगाबादेतील एकूण सतराशे शाळा ‘बंद’ असल्याचा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे. 

इंग्रजी शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांनी या बंदला पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून काम केले. शिवाय आगामी काळात विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था महामंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना, कास्ट्राईब संघटना, प्राथमिक मुख्याध्यापक संघ, जुक्‍टा, राष्ट्रवादी शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक सेना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक क्रांती यांच्यासह विविध संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News