माजी सैनिक कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; असा करावा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

 

  • शिष्यवृत्तीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे 15 ऑक्टोबर 2019 पूर्वी सर्व कागदपत्रांसह अर्ज  जमा करणे अनिवार्य

यवतमाळ: मागील शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदविका व पदवी परिक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण घेवून उत्तीर्ण होणाऱ्या तसेच विद्यापीठात संशोधनपर अभ्यास करणाऱ्या व 2019-20 या वर्षात पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या पाल्यांनी सीईटी, जेईईसाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफीकेट जोडणे अनिवार्य आहे.

शिष्यवृत्तीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे 15 ऑक्टोबर 2019 पूर्वी सर्व कागदपत्रांसह अर्ज  जमा करणे अनिवार्य आहे. एखाद्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया उशिरा सुरु झाल्यास प्रवेश दिनांकापासून एक महिन्याच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जासोबत शिष्यवृत्ती मिळण्याबाबतचा नमुना फार्म सैनिक कल्याण कार्यालयात तसेच http://yavatmal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

माजी सैनिक, विधवांच्या ओळखपत्राची झेरॉक्स, बोनाफाईट सर्टिफिकेट तसेच मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण केलेल्या गुणपत्रिकेची छायांकित साक्षांकित प्रत तसेच माजी सैनिक, विधवांच्या पाल्यास इतरत्र कुठुनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याबाबत कॉलेजचे, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही योजना माजी सैनिक, विधवांच्या पहिल्या तीन पाल्यांकरीता लागू राहील. जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीकरीता 07232-245273 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News