दहावी बारावी चे वेळापत्रक जाहीर .. 

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 November 2019

शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे.

मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी - बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येईल . तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर १५ ऑक्टोबर रोजी दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या  वेळापत्रकाविषयी काही सूचना आणि हरकती असल्यास १५  दिवसांत लेखी स्वरूपात देण्याची सूचना मंडळाने पालक व शिक्षकांना केल्या होत्या. 

या सूचनांनुसार मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना; तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. तसेच अन्य संकेतस्थळे किंवा इतर यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्‌सॲपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाऊ नये, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News