पर्यावरणाचा रक्षणासाठी ‘सेव्ह फ्लेमिंगोज वेटलॅंडस’ ऑनलाईन मोहीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • तळावे आणि टीएस चाणक्‍य येथे होत असलेला गगनचुंबी इमारत आणि गोल्फ कोर्सचा प्रयत्न अशाच ऑनलाईन मोहिमेतून पर्यावरणप्रेमी  सुनील अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला होता
  • सिडको प्रशासनाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा पर्यावरणप्रेमींनी कंबर कसली असून त्यांनी ‘सेव्ह वेटलॅंडस’ नावाने पुन्हा एकदा ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. 

नवी मुंबई - नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी शहरातील पाणथळ जागा, खारफुटी यांच्या संरक्षणासाठी विविध समाजमाध्यमांवर मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून शहरातील पाणथळ जागा, खारफुटीवर  राडारोडा, भराव टाकण्याच्या प्रकारात झालेली वाढ तसेच विकासाच्या नावाखाली होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी ‘सेव्ह फ्लेमिंगोज वेटलॅंडस’ नावाने मोहीम राबवली जात आहे.

तळावे आणि टीएस चाणक्‍य येथे होत असलेला गगनचुंबी इमारत आणि गोल्फ कोर्सचा प्रयत्न अशाच ऑनलाईन मोहिमेतून पर्यावरणप्रेमी  सुनील अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला होता. आता सिडको प्रशासनाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा पर्यावरणप्रेमींनी कंबर कसली असून त्यांनी ‘सेव्ह वेटलॅंडस’ नावाने पुन्हा एकदा ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. 

पाम बीच रस्त्याला लागून जवळपास ८० हेक्‍टर भूभाग खारफुटी आणि पाणथळीचा आहे. हा भूभाग व्यावसायिक दृष्टीने मोक्‍याच्या ठिकाणी असल्याने केवळ खासगी विकासकाचे हित साध्य व्हावे, यासाठी सिडकोचा अट्टहास सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. याशिवाय ‘सेव्ह फ्लेमिंगोज वेटलॅंडस’ अशीही मोहीम सुरू करण्यात आली आहे. उरण परिसरात असलेल्या पाणथळ जागांवर मोठ्या प्रमाणावर भराव होत आहेत. येथील बराचसा भाग सेझअंतर्गत येतो. संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने फ्लेमिंगोसह इतर देशी व विदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने स्थानिक व परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी, याकरिता ही मोहीम सुरू करण्यात 
आली आहे. 

उरण परिसरातील पाणथळ जागा पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. पक्ष्यांचे अधिवासाचे संरक्षण व्हावे, हा यामागे हेतू नाही. तर पूरसदृश स्थिती नियंत्रणासाठी पाणथळ महत्त्वाची भूमिका बजावतात.
- विवेक कडू, पर्यावरणप्रेमी

पाणथळी आणि तिवरे नष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही गोल्फ कोर्सप्रकरणी सिडको पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करत आहे. 
- सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News