साताऱ्याचा प्रवीण रमेश जाधव ठरणार तिसरा ऑलिंपिकपटू

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 18 June 2019
  • जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. 
  • प्रवीणचा जन्म सरडे  फलटण येथील छोट्याशा गावात झाला.
  • भुजबळ गुरुजींनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली

सातारा : देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. नेदरलॅंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीण जाधव याने भारतीय तिरंदाज संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप राय यांच्यासह उत्तम कामगिरी करून टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमधील आपले स्थान निश्‍चित केले आहे. 

प्रवीणचा जन्म सरडे  फलटण येथील छोट्याशा गावात झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंत्यत बेताची आहे. राहायला नीटसे घर नाही. उदरनिर्वाहासाठी आजही त्याचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. या परिस्थितीत प्रवीणने तिरंदाजी खेळ प्रकारात प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर राज्य शासनाने सन 2017-18 चे शिवछत्रपती पुरस्काराने त्याला गौरवले आहे. सरडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवीणने शिक्षण घेतले.

भुजबळ गुरुजींनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने क्रीडा प्रबोधिनीतून यश मिळवले. अमरावती येथील शिक्षण संकुलात त्याने बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. यादरम्यान त्याने तिरंदाजीत प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चमक दाखविली. सहा ते सात वर्षे त्याने स्वतःला तिरंदाजीत सिद्ध केले. तिरंदाजीमधील कौशल्याच्या जोरावर त्याने सैन्यदलात हवालदार पदावर नेमणूक मिळवली. सध्या तो घोरपडी येथील आर्मी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. नेदरलॅंडमधील स्पर्धेनंतर प्रवीण पुढच्या महिन्यात जागतिक पोलिस दलाच्या स्पर्धा तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक तिरंदाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध करणार आहे. 

प्रवीणची कामगिरी..
तिरंदाजीत लाकडाच्या धनुष्याद्वारे वर्षभराच्या सरावानंतर पहिल्याच राष्ट्रीय शालेय रिकव्हर्समध्ये चार सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर कसून सराव करून एकेक स्पर्धेत आपली छाप उमटवली. तिरंदाजीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, तैपेई आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक कास्यपदक प्राप्त केले. याबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक विद्यापीठस्तरीय स्पर्धा, जागतिक तिरंदाजी स्पर्धांत उज्ज्वल कामगिरी केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News