अजिंक्‍यताऱ्यामुळे साताऱ्याचे लौकिक देशभरात पोहचे; शिवेंद्रसिंहराजे भोसलेनी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज अजिंक्‍यतारा किल्ल्यावर जावून पाहणी केली. 
  • यावेळी इतिहासकार, ऐतिहासिक वास्तुविशारद यांच्या सहकार्याने अजिंक्‍यताऱ्यावर शिवसृष्टी आणि शाहू स्मारकाची उभारणी केली जाईल.

सातारा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज अजिंक्‍यतारा किल्ल्यावर जावून पाहणी केली. यावेळी इतिहासकार, ऐतिहासिक वास्तुविशारद यांच्या सहकार्याने अजिंक्‍यताऱ्यावर शिवसृष्टी आणि शाहू स्मारकाची उभारणी केली जाईल. ज्याने साताऱ्याचे नाव देशभरात ओळखले जाईल, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजेंनी माध्यमांशी बोलताना केले. 

अजिंक्‍यतारा किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी भव्य शिवसृष्टी आणि छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचा संकल्प शिवेंद्रसिंहराजेंनी शिवराज्याभिषेक दिनी सोडला होता. शिवेंद्रसिंहराजेंनी अजिंक्‍यताऱ्यावर राजसदर, गडाची तटबंदी यासह ढासळलेले बुरुज व अखेरच्या घटका मोजत असलेल्या किल्ल्यावरील वास्तूंची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. 

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अजिंक्‍यतारा किल्ला साताऱ्याचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. अजिंक्‍यताऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांची तिसरी राजधानी स्थापन केली. त्यांनतर त्यांनी शाहूनगरी अर्थात आजची सातारा नगरी वसवली. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर नाही, हे मनाला न पटणारे आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने अजिंक्‍यतारा किल्ला, ही भूमी पावन झालेली आहे.

शिवरायांनी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर वास्तव्यही केले आहे. त्यामुळे अजिंक्‍यताऱ्यावर शिवसृष्टी उभारणे आवश्‍यक आहे. अजिंक्‍यतारा म्हणजेच साताऱ्याचा इतिहास आहे. त्यामुळे हा इतिहास पुढच्या पिढीसमोर चांगल्या अवस्थेत गेला पाहिजे. याठिकाणी पर्यटन वाढले पाहिजे तसेच पर्यटकांसाठी सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत.'' 

आवश्‍यक त्या वास्तूंची डागडुजी केली जाईल. पुर्वी होते तसे होणार नाही. पण, किमान त्यासारखे झाले पाहिजे, या उद्देशाने जुन्या जाणत्या इतिहासकारांची मदत घेवून कशा पध्दतीने शिवसृष्टी साकारता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

पर्यटनमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार असून, अधिवेशनातही हा प्रश्‍न घेणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही याबाबत पाठपुरावा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पडलेले विद्युत खांब त्वरित उभे करुन दिवे सुरू करण्याची सूचनाही शिवेंद्रसिंहराजे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

साताऱ्यात अनेक दानशूर लोक आहेत, त्यांच्या सहकार्याने शिवसृष्टी आणि शाहू महाराज यांचे स्मारक उभारले जाईल. या कामासाठी सातारकर निश्‍चित मदत करतील. लवकरच बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत याबाबत बैठक घेतली जाणार असून त्यानंतर सर्वेक्षण आणि इस्टीमेट केले जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News