संस्कार भारती यवतमाळची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

गुरुपौर्णिमेला कलेचे आराध्य दैवत नटराजाचे पूजन केले जाते. त्यानिमित्ताने कलोपासकांचा गौरव करण्याची संस्कार भारतीची परंपरा आहे. 

यवतमाळ : ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत संस्कार भारतीच्या यवतमाळ समितीच्या वतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रातील चार ज्येष्ठ व्यक्तींचे त्यांच्या घरी जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.  गुरुपौर्णिमेला कलेचे आराध्य दैवत नटराजाचे पूजन केले जाते. त्यानिमित्ताने कलोपासकांचा गौरव करण्याची संस्कार भारतीची परंपरा आहे. 
      
यावर्षी सर्वप्रथम सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शरद् कळणावत यांच्या घरी हा सोहळा साजरा झाला. सरांच्या समर्थवाडीतील घरी अंगणात भू-अलंकरण विधेतील कार्यकर्त्यांनी सुंदर रांगोळी रेखून सरांना आमंत्रित केले. त्यांचे पादप्रक्षालन व औक्षण करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. संगीत विधेच्या कलावंतांनी संस्कार भारती ध्येयगीत म्हटले. विभाग प्रमुख प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी या कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. उपस्थित कलासाधकांना कळणावत सरांनी उद्बोधन केले. या प्रभातचिंतनाची शिदोरी घेऊन संस्कार भारती कलावंतांनी बाजोरिया नगरातील ज्येष्ठ चित्रकार-मूर्तिकार यार महंमद शेख यांचे घर गाठले.
      
यवतमाळ पोलीस विभागातून निवृत्त झालेल्या सुप्रसिद्ध शेख पेंटर यांचादेखील त्याच पद्धतीने सपत्नीक गौरव केला. यावेळी प्रांत सहमंत्री विवेक कवठेकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. शेख पेंटर आणि त्यांच्या परिवारासाठी हा पादप्रक्षालन, औक्षण, पूजन नि गौरवाचा सोहळा भावूक करणारा ठरला. विजय इंगोले यांनी शेख पेंटर यांच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.
       
संध्याकाळी बांगर नगर येथे राहणाऱ्या ज्येष्ठ धावपटू वीणा मोहतुरे यांचाही सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर सवाने यांनी त्यांचा परिचय करून दिला. पोलीस विभागात नोकरीसाठी नऊवारी पातळात धावून पहिल्या येणाऱ्या वीणाताईंनी देशभरात झालेल्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये ८७ पदकं प्राप्त केली आहेत. वयाच्या सत्तरीतही स्पर्धा गाजवणाऱ्या वीणा मोहतुरे राष्ट्रीय सणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात गणवेशात उपस्थित असतात.
       
शेवटी सुप्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. अनिल पटेल यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या मातोश्रींच्या समवेत हा सोहळा अनुभवताना डॉ. पटेल यांनी आई हाच आपला कसा अनुभवसिद्ध गुरु आहे, ते सांगितले. संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार यांनी डॉ. पटेल यांच्या कार्याची ओळख करून दिली. दत्तात्रय देशपांडे यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली. सुजित राय यांनी सर्वांना वृक्षभेट दिली. भक्ती जोशीने संचालन केले. जीवन कडू यांनी आभार मानले. 
       
या संपूर्ण सोहळ्यास प्रा. डॉ. माणिक मेहरे, राजश्री कुलकर्णी, प्रा. डॉ. स्वाती जोशी, आनंद कसंबे, प्राची बनगीनवार, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. नेहा चिंतावार, सुरेश राठी, अनंत कौलगीकर, वसंत उपगन्लावार, सुशील बत्तलवार, डॉ. गौरव पटेल, आशिष सरूरकर, अरुण लोणारकर, संजय सांबजवार, अपर्णा शेलार, निशिकांत थेटे, प्रिया कांडुरवार, सतीश अवधूत, श्रीदीप इंगोले यांच्यासह संस्कार भारतीचे कार्यकर्ते कार्यक्रमांना उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News