लोकसभेत वापरलेले ‘ईव्हीएम’च विधानसभेसाठी वापरणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वादाची शक्‍यता
  • मतदान यंत्रांची उपलब्धता
  • आयोगाकडे उपलब्ध असलेल्या ‘ईव्हीएम’ : १ लाख ३५ हजार 
  • सध्या ही यंत्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात
  • विधानसभेसाठी वापरण्याच्या आधी लोकसभेचा तपशील काढणार
  • सध्याची मशिन खराब झाल्यास कमी पडणाऱ्या मशिन अन्य राज्यांतून मागविणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशभरातून ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित होत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेसाठी वापरलेली यंत्रेच वापरण्यात येणार आहेत. यामुळे विरोधी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला विरोध होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केंद्रातील एकहाती सत्ता हस्तगत केल्यापासून देशभरातून विविध राजकीय पक्ष ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करीत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी निवडणूक आयुक्‍तांची भेट घेऊन आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दिल्लीत निवडणूक आयुक्‍तांची भेट घेत राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याची मागणी केली आहे. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही ‘ईव्हीएम’ला विरोध केला आहे. अशा प्रकारे ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित होत असतानाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेसाठी वापरलेल्या यंत्रांचा वापर होणार असल्याचे निवडणूक आयोगातून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ‘ईव्हीएम’ सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांची तपासणी होणार असून, लोकसभेचा तपशील काढून टाकण्यात येणार आहे. या वेळी काही मशिन खराब झाल्यास अन्य राज्यांतून मागविण्यात येतील किंवा ‘इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड’ या कंपन्यांकडून मागविण्यात येतील, अशी माहिती आयोगाने दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News