दिवाळीपूर्वीच मिळणार शिक्षकांना पगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 October 2019
  • दिवाळीपूर्वीच राज्यातील लाखो शिक्षकांना वेतन मिळणार आहे. वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे राज्यातील लाखो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

औरंगाबाद - दिवाळीपूर्वीच राज्यातील लाखो शिक्षकांना वेतन मिळणार आहे. वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे राज्यातील लाखो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन २४ तारखेपूर्वी होणार आहे. दिवाळीपूर्वी वेतन देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक समिती, शिक्षक भारती, राष्ट्रवादी शिक्षक संघासह विविध संघटनांनी शासनाकडे केली होती. दरम्यान, दिवाळी सणाची सुरवात यावर्षी २५ ऑक्‍टोबरपासून होत आहे.

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक यांना दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करता यावा, याकरिता ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये देय होणारे वेतन, निवृत्तिवेतन २४ ऑक्‍टोबरपूर्वी प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.नऊ) वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजित गोरे यांनी अध्यादेश काढला आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह मान्यताप्राप्त जिल्हा परिषद व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी; तसेच निवृतवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, असे आदेश अध्यादेशात देण्यात आले आहेत. 

निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे तसेच शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, श्‍याम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारे, रामू गायकवाड, राजू ठाकूर, लक्ष्मण घुगे, राजेंद्र मुळे, भाऊसाहेब बोर्डे, सुनील धाडबळे तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, दत्तात्रय गायकवाड, नजीर पठाण, विनोद पवार, रमेश जाधव,राजेश भुसारी यांनी  केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News