ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळतेय डिजिटल शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • माजलगाव तालुक्‍यातील झेडपीच्या ६० टक्के शाळा झाल्या हायटेक 

माजलगाव - डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे डिजिटलायझेशन होत असताना शासनाच्या जिल्हा परिषद शाळाही यात मागे राहिल्या नाहीत. तालुक्‍यातील एकूण २२९ शाळेपैकी १३२ शाळा या डिजिटल झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही आता डिजिटल शिक्षण मिळू लागले आहे.

देशाचा भावी आधारस्तंभ मजबूत करण्यासाठी शासनाने शिक्षणावर अधिक भर दिला आहे. माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण मुलांना लहानपणापासूनच मिळावे, यासाठी शासनाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. यामुळे तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटलच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीसह अनेक ठिकाणी लोकसहभागाचा आधार घेत शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला आहे. 

सद्यःस्थितीत तालुक्‍यातील २२९ पैकी १३२ शाळा डिजिटल झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले हायटेक शिक्षणाचा आनंद लुटत आहेत. जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आता पाटीवर गणिते सोडविण्याऐवजी समोर दिसणाऱ्या मोठ्या पडद्यावर सोडवत आहेत. कविता, गाणी, कथा शिक्षकांच्या तोंडून ऐकण्याऐवजी आता उत्तम संगीतबद्ध केलेल्या दृकश्राव्य माध्यमातून ऐकत आहेत. विविध चित्रवर्धक पाठ्यक्रम, तालबद्धसंगीत, प्रसंगाची अनुभूती यामुळे मूळ संकल्पना समजण्यास मदत होते. पाठ्यक्रमातील अभ्यास प्रत्यक्षात डोळ्यासमोर दिसत असल्याने विद्यार्थ्यांना समजायलाही तो सोपा जात आहे.

पटसंख्या वाढीला मदत
आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे लोण ग्रामीण भागातही पोचल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे; परंतु या शाळांनीही बदलत्या प्रवासोबत जाऊन डिजिटलायझेशनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढायला मोठी मदत होत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.

डिजिटल शाळेचे धोरण झपाट्याने राबविण्यात येत असल्याने १३२ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. उर्वरित शाळाही लवकरच डिजिटल करण्याचा आमचा मानस आहे.
-रवींद्र महामुनी, गटशिक्षणाधिकारी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News