मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • एकाच दिवसात दोन घटना
  • चार प्रवासी जखमी

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकलवर दगडफेकीच्या दोन घटना मंगळवारी घडल्या. मुख्य मार्गावर झालेल्या दगडफेकीत तीन प्रवासी जखमी झाले. हार्बर मार्गावरील दगडफेकीच्या घटनेत एक तरुण जखमी झाला.

मंगळवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान गॅमन पुलाजवळ लोकलवर एका व्यक्तीने दगड भिरकावला. या घटनेत रतनदीप जगन्नाथ चंदनशिवे या तरुणाच्या डाव्या हाताला जखम झाली. 

राजेश पवार (१७) याच्या उजव्या डोळ्याला मार लागला, तर अजय हरिषणकर (२३) याच्या डोक्‍याला दुखापत झाली. हार्बर मार्गावर कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान लोकलवर फेकण्यात आलेला दगड लागल्यामुळे तौसिफ खान (३२) हा प्रवासी जखमी झाला. हार्बर मार्गावरील स्थानकांलगत दोन्ही बाजूंना असलेल्या झोपडपट्ट्यांतून दगडफेक केली जाते. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. 

चार महिन्यांत १३ घटना
चार महिन्यांत लोकलवरील दगडफेकीच्या १३ घटना घडल्या आहेत. सर्वाधिक घटना घाटकोपर परिसरात घडल्या आहेत. मार्च ते जूनदरम्यान विक्रोळी-कांजूर मार्ग आणि घाटकोपर-विक्रोळी या पट्ट्यात सर्वाधिक आठ दगडफेकीच्या घटनांची नोंद झाली. टिटवाळा-खडवली आणि अंबिवली-टिटवाळा पट्ट्यात दोन घटना घडल्या. मानखुर्द-गोवंडी, ठाणे-कळवा आणि विद्याविहार येथे दगडफेकीची प्रत्येकी एक घटना घडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News