"स्टुडंट ऑफ द इयर-2'मध्ये  झळकणार नाशिकचा रोहित 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 May 2019
  • टायगर श्रॉफसोबत काम करण्याची संधी; पहिल्याच प्रयत्नात यश 
  • रंगभूमीच्या प्रेमातून गाठला यशाचा मार्ग 

नाशिक, ता. 6 ः धर्मा प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेला "स्टुडंट ऑफ द इयर-2' हा चित्रपट आठवड्यात प्रदर्शित होत आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह अभिनेत्री अनन्या पांडे, तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात नाशिकचा रोहित दंडवाणी यालादेखील भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. महाविद्यालयीन तरुणाईवर आधारित अन्‌ कबड्डी स्पर्धेभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात रोहित खोडकर विद्यार्थ्याची भूमिका करतोय. टायगर श्रॉफसह अन्य दिग्गज कलावंतांसोबत काम करताना आलेला अनुभव खूपच आनंददायी असल्याचे रोहितने सांगितले. 
रोहित म्हणाला, की चित्रपटासाठी दिलेल्या पहिल्याच ऑडिशनमध्ये निवड झाल्याने उत्साह वाढला. "स्टुडंट ऑफ द इयर'च्या यशानंतर आता "स्टुडंट ऑफ द इयर-2' चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. चित्रपटात कबड्डी स्पर्धेच्या रंगतसोबत ऍक्‍शन, ड्रामा आणि भरपूर काही बघायला मिळणार आहे. शूटिंगपूर्वी आम्ही सर्वांनी अर्जुन पुरस्कारविजेते प्रसाद राव यांच्याकडून कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. ऍक्‍शनसाठीचे प्रशिक्षण श्‍याम कौशल यांच्याकडून घेतले. या प्रशिक्षणादरम्यान प्रसाद राव व श्‍याम कौशल यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनीही प्रत्येक सीनसाठी मार्गदर्शन केले. नवोदित कलावंतांना त्यांनी प्रोत्साहित करताना खूप चांगली वागणूक दिली. अभिनेता आदित्य सिलदेखील आमच्यात मिसळून चांगला संवाद ठेवायचा. 

आमच्या आधी टायगर पोचायचा जिममध्ये 
शूटिंगचे वेळापत्रक सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत असायचे. सर्व काम आटोपल्यानंतर आम्ही जिममध्ये सायंकाळी जमायचो. सर्व शूटिंगमध्ये दमलेले असले तरी बरोबर सातला टायगर श्रॉफ जिममध्ये हजर व्हायचा. इतकेच नाही माझ्यासह अन्य सर्व नवोदित कलाकारांना तो वर्कआउटबद्दल मार्गदर्शनही करायचा. त्याच्यासोबत काम करताना व एकंदरीत या चित्रपटादरम्यान आलेला अनुभव करिअरसाठी उपयुक्‍त ठरणार असल्याचे रोहितने सांगितले. 

रंगभूमीच्या प्रेमातून गाठला यशाचा मार्ग 

पुण्यातील सिम्बॉयोसीस महाविद्यालयातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रोहितला शालेय वयापासून रंगभूमीचे आकर्षण होते. शाळेतील बालनाट्य स्पर्धेत त्याचा सहभाग असायचा. इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यानही तो नाटकांमध्ये सहभाग नोंदवायचा. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी वडिलांनी एक वर्षाची सवलत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी पहिल्याच प्रयत्नात चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे रोहितने सांगितले. त्यातच धर्मा प्रॉडक्‍शनसारख्या नामांकित संस्थेत संधी मिळणे म्हणजे दिवंगत यश जोहर यांच्यासह करण जोहर यांचा एकप्रकारे आशीर्वाद मिळाला, असे मी समजतो. कुटुंबाला महत्त्व देतानाच करिअरमध्येही घवघवीत यश मिळेल, असा विश्‍वास रोहितने व्यक्‍त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News