महाविद्यालये सुरू होताच रोडरोमिओंचा त्रास वाढला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • शाळा-महाविद्यालये सुरू होताच चौसाळा येथे रोडरोमिओंची संख्या वाढली असून, या ठिकाणी दामिनी पथक स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.
  • मुलींच्या सुरक्षेसाठी शहराबरोबर आता चौसाळ्यासारख्या निम्नशहरी भागातही दामिनी पथक नेमण्याची मागणी मुलींमधून होत आहे.

बीड - शाळा-महाविद्यालये सुरू होताच चौसाळा येथे रोडरोमिओंची संख्या वाढली असून, या ठिकाणी दामिनी पथक स्थापन करावे, अशी मागणी होत आहे. चौसाळा हे बीड तालुक्‍यातील ग्रामीण भागातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून या ठिकाणी दोन वरिष्ठ महाविद्यालये, दोन कनिष्ठ महाविद्यालये, जिल्हा परिषदेची एक प्राथमिक शाळा, एक माध्यमिक हायस्कूल, संस्थेच्या दोन शाळा, तीन इंग्लिश स्कूल तसेच खासगी क्‍लासेस व संगणक क्‍लासेस आहेत. जवळपास ४० ते ४५ गावांतील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी चौसाळ्यात येतात. यात मुलींची संख्या मोठी आहे. 

सर्व मुली खेडेगावातील असल्यामुळे त्यांना तासन्‌तास बस, रिक्षाची वाट पाहत बसस्थानक व रिक्षा पॉइंट या ठिकाणी थांबावे लागते. बस वेळेवर येत नाहीत. हीच संधी साधत रोडरोमिओ मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या आहेत, त्या ठिकाणी चकरा मारणे, मोटारसायकलवरून विनाकारण हॉर्न वाजवीत जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार करीत आहेत. चित्रविचित्र पोशाख, केसांची स्टाईल, मोबाईलवर गाणे वाजवत इकडून तिकडे फिरणे हा रोडरोमिओंचा नित्यक्रम बनला आहे. या सर्व प्रकारांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून, काही पालक दहावीनंतर मुलींचे शिक्षण बंद करू लागले आहेत. काही मुलींनी सांगितले की, हा प्रकार घरी सांगितल्यास शिक्षण बंद होऊ शकते किंवा याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. यामुळे आम्ही पालकांना सांगत नाहीत. दरम्यान, मुलींच्या सुरक्षेसाठी शहराबरोबर आता चौसाळ्यासारख्या निम्नशहरी भागातही दामिनी पथक नेमण्याची मागणी मुलींमधून होत आहे.

याप्रकरणी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चौसाळा शहरात मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यास भाग पाडू. शहराबाहेर दोन किलोमीटर अंतरावर असलेली पोलिस चौकी शहरात आणण्याची मागणी यापूर्वी अनेकवेळा आम्ही केलेली आहे. पोलिस चौकी तत्काळ शहरात न आणल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.
- अशोक लोढा, जिल्हा परिषद सदस्य

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News