‘चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजांचे विघ्न !

सकाळ (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • चिंचपोकळी स्थानकावर गर्दीचा लोट
  • रेल्वेस्थानकांवर तरुणांची हुल्लडबाजी

मुंबई : प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, आरडाओरड, बेशिस्त, गर्दीतील मुलांची हुल्लडबाजी अशा वातावरणात चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रविवारी पार पडला.

‘चिंतामणी’चे यंदाचे १०० वे वर्ष म्हणून केवळ परळ-लालबाग परिसरातील नव्हे, तर मुंबईतील कानाकोपऱ्यातील नागरिकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. याच उत्साहामध्ये आगमन सोहळ्याला हुल्लडबाजीचे गालबोट लागले.

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला रविवारी दुपारी १.४५ च्या सुमारास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजल्यापासून चिंचपोकळी-लालबाग परिसरात तरुणांची गर्दी झाली होती. भाविकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, की पाय ठेवायलाही जागा नव्हती. गर्दीची तमा न बाळगता मुलांसह मुलीही आगमन सोहळ्यात बेधुंद झाल्या होत्या.

गणेशमूर्तीची ट्रॉली जशी पुढे जात होती तसतशी गर्दी वाढत गेली. गर्दीचा फायदा घेत त्यातील काही तरुण उगाच आरडाओरड करत मध्येच नाचणे असे हुल्लडबाजीचे प्रकार करत होते. त्यामुळे इतर लोकांना त्रास होत होता. रस्त्यात ठिकठिकाणी तुटलेल्या चपला विखुरल्या होत्या. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या दिसत होत्या; ‘चिंतामणी’चे स्वयंसेवक त्या बाटल्या उचलत होते. ‘चिंतामणी’च्या स्वयंसेवकांची फौज मदतीला असूनही झालेल्या गर्दीवर आवर घालताना पोलिसांना नाकीनऊ आले. गर्दी रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. लालबाग उड्डाणपुलाखाली बॅरिकेटस्‌मध्ये लावलेल्या झाडांची गर्दीमुळे नासधूस झाली.

अनेक तरुणांचे घोळके लालबाग पुलाखाली मौजमस्ती करत होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास चिंतामणी आपल्या मंडळाच्या दिशेने रवाना झाला. गणेशमूर्ती मंडळात पोहचली तरी गर्दी ओसरली नव्हती. गणेशमूर्ती मंडपात पोहोचल्यानंतर पुलाखालील वाहतुकीला सुरुवात झाली. गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि सुमारे तासभर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले; तर चिंचपोकळी पुलावरही गर्दी होती.

चिंचपोकळी स्थानकावर गर्दीचा लोट
चिंचपोकळी पूल धोकादायक घोषित करण्यात आल्याने मंडळाने करी रोड स्थानकावरून भाविकांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन करूनही दुपारी २ नंतर चिंचपोकळी स्थानकावर मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यकर्ते स्थानकाच्या बॅरिकेटस्‌वर उभे राहून मार्गदर्शन करत होते. एवढ्या गर्दीतही लोक सेल्फी आणि व्हिडीओ शूट करत होते. 

रेल्वेस्थानकांवर तरुणांची हुल्लडबाजी
मुलुंड स्थानकानंतर प्रत्येक स्थानकावर तरुणाईचा आरडाओरडा ऐकू येत होता. चिंतामणी, गणपती बाप्पा मोरया, अशा घोषणा दिल्या जात होत्या. तरुणांच्या टोळक्‍यांकडून केल्या जाणाऱ्या आरडाओरड्यामुळे लोकल डब्यांत प्रवाशांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुर्ला, दादर, परळ, करी रोड या स्थानकांवर ‘चिंतामणी’चे टी-शर्ट घालून आलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News