राज्यभर रिक्षांचा संप - प्रवाशांचे होणार हाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • चालक-मालक संघटनांचा इशारा
  • चालक-मालकांच्या समस्या प्रलंबित असल्यामुळे संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा घेतला निर्णय
  • रिक्षाने नियमित प्रवास करणाऱ्यांना  बसणार फटका

मुंबई : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा झालेली असतानाही सरकारने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. कामगार विभागांतर्गत ते तत्काळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसह काही प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

मुंबईसह राज्यात रिक्षा चालक आणि मालक मिळून २० लाख प्रवासी वाहतूकदार आहेत; मात्र अद्याप या चालक-मालकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जूनला संघटनेची परिषद झाली. त्यात कृती समितीने एकमताने संपाचा ठराव मंजूर केला.

समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. दिवसभरात सकारात्मक चर्चेतून मागण्या मान्य न झाल्यास संप करण्याचा इशारा समितीने दिला आहे. 

मुंबई उपनगरसह राज्यभर रिक्षांचा संप असेल. त्यामुळे रिक्षाने नियमित प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

कामगार विभागांतर्गत कल्याणकारी महामंडळ तत्काळ स्थापन करावे, विम्याच्या नावावर सुरू असलेली रिक्षा चालक-मालकांची लूट थांबवावी, भविष्य निर्वाह निधी योजनेत आणि ‘ईएसआयसी’ योजनांमध्ये समाविष्ट करावे, हकीम समितीच्या शिफारसी तंतोतंत लागू करण्यात याव्यात,

बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नेमावीत, राज्यातील रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत, तीन वर्षांहून अधिक काळासाठी असलेल्या चालकांनाच बॅच द्यावा, ओला, उबर आणि इतर बेकायदा टॅक्‍सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी आदी मागण्या समितीने केल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News