मराठा आरक्षाणातील फेररचनेमुळे यंत्रणेची तारांबळ

विवेक मेतकर
Friday, 28 June 2019

१६ ऐवजी १२ टक्के जागा; अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशावर परिणाम

अकोला  ः महाविद्यालयीन प्रवेशाची धामधुम अन् त्यातच जाहिर झाला उच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा निकाल. मात्र, पूर्वीच्या १६ टक्के धांदलीत एसईबीसी आरक्षणात कपात केल्याने सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यासाठी प्रवेश यंत्रणांना सीट मॅट्रीकमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षणात १६ ऐवजी आता १२ टक्के आरक्षण मिळणार असल्याने ४ टक्के जागा कमी होणार आहेत. त्या खुल्या वर्गासाठी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यभरात आयटीआय, पॉलिटेक्निक, अकरावी याचेही प्रवेश सुरू आहे. या प्रवेशांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १६ टक्के आरक्षण ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रवेशाच्या जागा जाहीर करण्याची प्रक्रियाही प्रशासनांकडून सुरू होती. यातच न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेशामध्ये १२ टक्के आरक्षण लागू करावे लागणार आहे. यामुळे पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासनांना उपलब्ध जागांमध्ये नव्याने वाटप करावे लागणार आहे.

सीट मॅट्रिकमध्ये बदल
प्रवेशासाठी यापूर्वी १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवणारे शिक्षण उपसंचालक कार्यालय, आयटीआयचे प्रवेश प्रक्रिया राबवणारे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय आणि पदविका व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणारे तंत्र शिक्षण संचालनालय आणि पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक प्रवेशासाठी सीईटी सेल आदी यंत्रणेनेन आपल्या विविध अभ्यासक्रमांत बदल करताना सीट मॅट्रिकमध्ये बदल केला आहे. आता पुन्हा १६ ऐवजी १२ टक्के एसईबीसी आरक्षण होईल त्यामुळे ४ टक्के जागा खुल्या वर्गाला मिळणार आहेत.

टक्केवारीची डोकेदुखी
आयटीआय प्रवेशात एसईबीसी प्रवर्गासाठी १६ टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के असे २६ टक्के आरक्षण दिले जाणार असल्याने खुल्या वर्गातील ५० टक्के आरक्षण कमी होवून यावर्षी २४ टक्के झाले होते. नव्याने एसइबीसी १२ टक्के होणार असल्याने आयटीआय प्रवेशाचा खुला वर्ग आता २८ टक्के असणार आहे. पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमात एकूण सर्व आरक्षण ६६ टक्के देण्यात आले आहे. त्यामधील १६ टक्के एसईबीसी मधील ४ टक्के आरक्षण कमी होईल.

चार टक्के जागा खुल्या गटाला
सर्वच प्रवेशांची गुणवत्ता यादी जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. आता नव्याने आरक्षणाचा तक्‍ता तयार करुन यादी जाहीर करावी लागेल. प्रवेशामध्ये यापुर्वी १६ टक्के जागा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार होत्या. पण आता १२ टक्के जागा मिळणार असल्याने प्रवेशामध्येही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये ४ टक्के कमी होतील. त्या जागा खुल्या गटाला मिळतील.

जात वैधता अट शिथील
प्रवेशासाठी यंदा नव्याने लागू केलेल्या मराठा (एसईबीसी) व आर्थिक दुर्बलांचा आरक्षणाचा (सवर्ण) लाभ यंदाच्या सर्वच प्रवेशात दिला जाणार आहे. हे आरक्षण नव्याने लागू केल्यामुळे यावर्षी जात वैधता प्रमाणपत्राची अट काढून टाकली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News