महाविद्यालयात नेमण्यात येणार सेवानिवृत्त शिक्षक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • महाविद्यालयात विनाअनुदानित अभ्यासक्रमांना नियमित प्राध्यापक नसल्याचे चित्र दिसून येते.  
  • सेवानिवृत्त प्राध्यापकांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.
  • विषयावर सोमवारी  सदस्यांनी विद्यापीठाला चांगलेच धारेवर धरले.

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयात विनाअनुदानित अभ्यासक्रमांना नियमित प्राध्यापक नसल्याचे चित्र दिसून येते. मात्र, आता यासंदर्भातील तिढा सुटला असून सोमवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत विना अनुदानित महाविद्यालयात रिक्त जागांवर सेवानिवृत्त प्राध्यापकांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरुन 65 वर्ष केले. त्यावरुन राज्य सरकारनेही त्यात बदल करुन 60 वरुन 65 वर्ष सेवानिवृत्तीचे वय केले. मात्र, काहीच दिवसात राज्य सरकारने काही कारणे देत, पुन्हा नवीन अध्यादेश काढून प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वरुन 60 वर्ष केले. यामुळे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर अनुदानित महाविद्यालयांना प्राध्यापक भरतीसाठी मान्यता घेणे आवश्‍यक आहे. मात्र, विनाअनुदानित महाविद्यालयात या पदावर प्राध्यापकांची नेमणूक करताना त्याच अर्हता असलेल्या व्यक्ती मिळत नसल्याची ओरड महाविद्यालयांकडून वारंवार होताना दिसून येत होती. विशेष म्हणजे नियमित शिक्षक नसल्याने विद्यापीठाकडून 129 महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावण्यात आली. या विषयावर सोमवारी  सदस्यांनी विद्यापीठाला चांगलेच धारेवर धरले. तसेच कंत्राटी शिक्षक नेमण्याची परवानगी मागीतली. 

बऱ्याच चर्चेनंतर यासंदर्भात डॉ. आर.जी.भोयर यांनी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात एक नियमित शिक्षक नेमण्याची अट रद्द करुन त्याऐवजी पदव्युत्तर मान्यताप्राप्त शिक्षक नेमण्याची अनुमती देत, 60 वर्षानंतर वा सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान त्यावर विद्यापीठाने समिती स्थापन केली असून ही समिती विविध बाबींचा अभ्यास करणार आहे. 
समितीने मंजूरी दिल्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सेवानिवृत्त प्राध्यापकांना नेमता येणे शक्‍य होणार आहे. 

तासिका तत्वावरील शिक्षक होणार एक्‍सपर्ट 
विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी अनुदानित आणि अनुभवी मान्यताप्राप्त प्राध्यापकांना बोलाविण्यात येते. मात्र, अनेकदा महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना महाविद्यालयाची कामे असल्याने ती मूल्यांकनासाठी वेळेवर येत नाही. यासाठी अनेकदा विद्यापीठाकडून महाविद्यालयांच मनधरणी करावी लागते. त्यामुळे आता यावर उपाय म्हणून महाविद्यालयात तासिका तत्वावर आणि अर्हताधारक प्राध्यापकांना मूल्यांकनाचे काम देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात विद्वत परिषदेद्वारे निर्णय घेण्यात आला. कायद्यात तशी तरतूद असून त्यांना "एक्‍सपर्ट'म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News