विषय शिक्षकच शिकवणार ‘इंग्रजी’चा विषय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • सरकारी शाळांतील इंग्रजी माध्यम; नवीन शिक्षकांची नेमणूक नाहीच, शैक्षणिक नुकसान शक्‍य

बेळगाव - शहर व ग्रामीण भागातील काही सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात येत आहे. नवीन वर्ग सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंग्रजी विषय शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक होते. परंतु, तसे न करता संबंधित शाळांतील इंग्रजी शिक्षकांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. सरकारी शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमतरता असताना कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्‍त भार टाकल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

राज्यातील युती सरकारने इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राज्यातील एक हजार शाळांमध्ये इंग्रजी माध्यम शाळा सुरु करण्यात येत आहेत. बेळगाव शहरात चार तर ग्रामीणमध्ये ७ इंग्रजी माध्यम शाळा सुरु करण्यात येत आहे. सध्या इंग्रजी माध्यमांसाठी प्रवेश देण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक वर्गात ३० मुलांना प्रवेश दिला जाणार असून १० पासून शाळा सुरु होणार आहेत. इंग्रजी माध्यम सुरु होणाऱ्या शाळांतील इंग्रजी शिक्षकांना डायटमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे, पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याबरोबर नव्याने सुरु होणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या वर्गांनाही त्यांना शिकवावे लागणार आहे. हा भार ते कसा पेलतात यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे.

इंग्रजी माध्यम सुरु झालेल्या शाळा

  • बेळगाव शहर
  • सरकारी उर्दू शाळा, खंजर गल्ली
  • सरकारी कन्नड शाळा क्र. १४ वडगाव (जेल शाळा)
  • सरकारी कन्नड शाळा, रामतीर्थनगर 
  • सरकारी कन्नड शाळा, महांतेशनगर
  • बेळगाव तालुका
  • सरकारी मराठी शाळा, कडोली 
  • सरकारी कन्नड शाळा, मच्छे
  • सरकारी कन्नड शाळा, सुळेभावी 
  • सरकारी कन्नड शाळा, कंग्राळी बुद्रूक
  • सरकारी कन्नड शाळा, हिरेबागेवाडी
  • सरकारी कन्नड शाळा, खणगाव 
  • सरकारी कन्नड शाळा, के. के. कोप्प

मराठी शाळांकडे दुर्लक्ष
शहर व ग्रामीण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक आहे. मात्र, पहिलीपासून मराठीचे वर्ग सुरु करताना मराठी शाळांना डावलण्यात आले आहे. बेळगाव तालुक्‍यातील कडोली मराठी शाळेची निवड इंग्रजी वर्ग सुरु करण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, आणखी काही मराठी शाळांमध्येही इंग्रजीचे वर्ग सुरु करणे आवश्‍यक होते, असे मत पालक व शिक्षकांतून व्यक्‍त होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News