काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच - आता या नेत्यांनी दिला राजीनामा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदेे यांचा राजीनामा
  • परंतु स्वीकारण्यास कोणीच नाही

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर तब्बल सव्वा महिन्याने ‘राहुल ब्रिगेड’च्या नेत्यांनी राजीनामा देणे सुरू केल्यामुळे काँग्रेसमधूनच आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेत्यांवर राजीनाम्यासाठी दबाव आणण्याचा हा प्रकार असल्यासारखे याकडे पाहिले जात आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी पदांचा आज राजीनामा दिला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या राहुल गांधींनी मागील आठवड्यात जाहीर संदेश देऊन लवकरात लवकर नवा अध्यक्ष निवडण्याचे आवाहन पक्षातील ज्येष्ठांना केले होते. यामुळे जुन्या नेत्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, असा अंदाज लढविला जात असताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी ‘तरुण चेहऱ्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवावे’, असा राग आळवल्याने नव्या नेत्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांच्या निकवर्तीय वर्तुळातील मानले जाणारे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अध्यक्षपद मिळालेले देवरा दक्षिण मुंबईतून पराभूत झाले होते. अशाच प्रकारे निवडणूककाळात पश्‍चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळालेले प्रभारी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. शिंदे यांना त्यांच्या पारंपरिक गुना मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. तर, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अवघ्या काही महिन्यांपूर्वी संधी मिळालेले केशव यादव यांनीही राजीनामा दिला आहे. 

अशा प्रकारे राजीनाम्यांच्या घोषणांद्वारे निष्ठेचे प्रदर्शन करण्याबरोबरच जुन्या नेत्यांवर राजीनाम्यासाठी दबाव आणण्याचीही खेळी यामागे असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच तर, ‘राहुल गांधींची समजूत काढण्यासाठी पाच मुख्यमंत्र्यांनी आपले राजीनामे आधीच देऊ केले असल्याचे सांगून या खेळीतील हवा काढली होती’, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर राहुल गांधींनी २५ मे रोजी राजीनामा दिला होता. आता राजीनाम्यासाठी पुढे सरसावणाऱ्या या नेत्यांनी तब्बल सव्वा महिना उलटेपर्यंत विलंब का लावला, असाही सवाल या नेत्याने केला. काँग्रेसच्या अन्य एका वरिष्ठ नेत्याने अनौपचारिकपणे बोलताना या राजीनाम्यांची चांगलीच खिल्ली उडवली. संघटनात्मक बदलांसाठी काँग्रेस अध्यक्षांना मोकळीक मिळावी यासाठी राजीनामा देण्याचा प्रकारच निरर्थक आहे. 

एखादी व्यक्ती विशिष्ट पदावर नको असेल तर सहजपणे हटविण्याची मुभा पक्षाध्यक्षांना आहे. पक्षाध्यक्षांना विरोध करून काँग्रेसमध्ये कोणीही पदाला चिकटून राहू शकत नाही, असे असताना या राजीनाम्यांना काय अर्थ आहे, असा खोचक सवालही राहुल गांधींच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानल्या जाणाऱ्या या नेत्याने केला.

राजीनामा देणारे ज्योतिरादित्य शिंदे हे तिसरे सरचिटणीस आहेत. त्याआधी मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस दीपक बावरिया, तर आसामचे प्रभारी सरचिटणीस हरीश रावत यांनी राजीनामा दिला आहे. त्याव्यतिरिक्त छत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया, तसेच संलग्न संघटनांचे पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांबद्दल संघटना सरचिटणीस वेणुगोपाल यांनी ‘राजीनामे स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार नसल्याचे’ स्पष्ट केले आहे, तरीही राजीनामानाट्य वेगात सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News