सार्वजनिक बॅंकांवरील निर्बंध शिथिल करा; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मागणी
  • सरकारच्या हस्तक्षेपावर अप्रत्यक्ष टीका
  • 'व्हॉट दी इकॉनॉमी नीड्‌स नाऊ’ या पुस्तकात मांडली मते

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांवरील निर्बंध शिथिल केल्यास त्यांची कामगिरी उंचावेल, असे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ‘व्हॉट दी इकॉनॉमी नीड्‌स नाऊ’ या नव्या पुस्तकात राजन यांनी सरकारच्या हस्तक्षेपावर अप्रत्यक्ष टीका केली. कृषी क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.

सरकारचे बॅंकांवर अनेक वर्षांपासून नियंत्रण आहे. मात्र विद्यमान सरकार निष्क्रिय असल्याचे राजन यांनी पुस्तकात म्हटले आहे. सरकारकडून बॅंकांना कर्ज वितरणाचे लक्ष्य आणि कर्जमाफीची सक्ती हे बॅंकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. सरकारच्या निर्बंधांमुळे बऱ्याचदा कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही.

कर्जमाफीसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेहमीच कठोर भूमिका मांडली आहे. यामुळे पतव्यवस्थेची घडी विस्कटेल. याशिवाय अर्थसंकल्पावर बोजा वाढेल, अशी भीती राजन यांनी ‘बॅंकिंग सुधारणा’ या विषयावरील लेखात व्यक्त केली आहे. बॅंकिंग यंत्रणा बुडीत कर्जांच्या वाढत्या बोजाने डोईजड बनली आहे. त्यामुळे उद्योगांना नव्याने पतपुरवठा करण्यास बॅंकांना अडचणी येत असल्याचे मत राजन यांनी व्यक्‍त केले.

‘व्हॉट दी इकॉनॉमी नीड्‌स नाऊ’ या पुस्तकात राजन यांच्यासह अभिजित बॅनर्जी, गिता गोपीनाथ आणि मिहिर एस. शर्मा यांनी मते मांडली आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News