पपेटीअर सोहमच्या कलाकारीची "इंडिया बुक"मध्ये नोंद

परशुराम कोकणे
Monday, 19 August 2019
  • अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भोंदूबाबा अभिनय कार्यक्रम, हास्यसम्राट दीपक देशपांडे यांची हॅलो ताई मिमिक्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडाही तो उत्तमरीत्या सादर करतो.

सोलापूर: सोलापूरचा बाल कलाकार सोहम येमूल याची भारतातील कमी वयाचा शब्दभ्रमकार आणि कठपुतली कलाकार म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आई सोनाली आणि वडील शाम येमूल यांच्या प्रोत्साहनातून सोहमने हे यश मिळवले आहे. आठ वर्षे नऊ महिने वयाचा सोहम सोलापुरातील दमाणी विद्यामंदिरात तिसरीच्या वर्गात शिकायला आहे. 

सोहम हा सोलापुरातील विविध गणपती मंडळे, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात गेल्या तीन वर्षांपासून आपली कला सादर करीत आहे. मनोरंजनासोबत आपल्या शब्दभ्रम कलेतून सोहम विविध सामाजिक संदेश देत असतो. लहान वयातील त्याच्या कलेच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली असून त्याला मेडल, सर्टिफिकेट, बॅच, 2019 या वर्षाचे रेकॉर्ड बुक आणि ऍचिव्हर आय कार्ड बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. 

वयाच्या चौथ्या वर्षापासून सोहमला शब्दभ्रम कलेत आवड निर्माण झाली. तो लहानपणापासूनच जागतिक कीर्तीचे भारतातील ज्येष्ठ शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे व्हिडिओ पाहायचा. तसेच सोलापूरचे प्रसिद्ध जादूगार आणि शब्दभ्रमकार गुरुराज मिरजी यांच्याकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. कुटुंबीयांसोबत श्री म. फ. दमाणी प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका निर्मला भोसले आणि इतर शिक्षकांकडूनही सोहमला प्रोत्साहन मिळत आहे.

सोहम वक्तृत्व कलेत उत्तम आहे. त्याला आजवर जिल्हा, राज्य आणि आंतरशालेय स्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. शब्दभ्रम कार्यक्रमासोबत सोहम जादूचे प्रयोग दाखविणे, स्वच्छ भारत अभियानासाठी सादरीकरण, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भोंदूबाबा अभिनय कार्यक्रम, हास्यसम्राट दीपक देशपांडे यांची हॅलो ताई मिमिक्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडाही तो उत्तमरीत्या सादर करतो.

सोहमची शब्दभ्रम कलेतील आवड पाहून वडील शाम यांनी त्याच्यासाठी खास विविध बोलक्‍या बाहुल्या आणि दोन कठपुतल्या बनविल्या. सध्या त्याच्याकडे छोटूसिंग पपेट, केक पपेट, मोदीजी पपेट, सोनुली पपेट, डायनासोर पपेट आणि बुक पपेट आहेत. तसेच पोवाडा गाणारी कठपुतली आणि शाळेला जाणारी छोटू कठपुतलीसुद्धा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News