प्रश्‍नोत्तराच्या तासात राज्यसभेत विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019
  • फाफटपसाऱ्याला चाप लावल्याने सर्वच्या सर्व प्रश्‍नांना मंत्र्यांची उत्तरे
  • संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज प्रश्‍नोत्तराच्या तासात सर्वच्या सर्व म्हणजे १५ तोंडी प्रश्‍नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज प्रश्‍नोत्तराच्या तासात सर्वच्या सर्व म्हणजे १५ तोंडी प्रश्‍नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. संसदीय कामकाजात असा विक्रम प्रदीर्घ काळानंतर नोंदविला गेला आहे. उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी प्रश्‍न विचारताना व मंत्र्यांनी उत्तरे देताना पाल्हाळ लावण्यास सक्त चाप बसविल्याने हे शक्‍य होऊ शकले. आजच्या एका दिवसात २५ ते तीस प्रश्‍नांना उत्तरे दिली गेली. सर्वपक्षीय सदस्यांनी याबद्दल नायडू यांचे अभिनंदन केले.

संसदेत दोन्ही सभागृहांच्या कार्यक्रम पत्रिकेत असलेल्या सर्वच्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे येणे, हे उंबराच्या फुलाइतकेच दुर्मीळ मानले जाते. लोकसभेत एका दिवशी २०, तर राज्यसभेत १५ तोंडी प्रश्‍न नोंदविलेले असतात. प्रत्यक्षात त्यातील जेमतेम ६ ते ७ प्रश्‍नच विचारले जाऊ शकतात, हा पूर्वानुभव आहे. नायडू यांनी एका तासात २० प्रश्‍न विचारणे व त्यांची उत्तरे मिळणे प्रॅक्‍टिकली अशक्‍य असताना कार्यक्रम पत्रिकेत तरी कशाला ते देता, असे म्हणून तोंडी प्रश्‍नांची संख्या कमी केली. दोन दिवस त्यांनी उपसभापती हरिवंश यांना प्रश्‍नोत्तर तासाचे संचालन करण्यासाठी सांगितले होते.

मात्र मंत्रिपदाचा अनुभव असलेले विरोधी पक्षीय खासदार हरिवंश यांना जुमानत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे नायडू यांनी आज पुन्हा प्रश्‍नोत्तर तासाची सूत्रे घेतली व अतिशय कडकपणे हा तास चालविला. आज आरोग्य विभागाचे आठ, ऊर्जा व अर्थमंत्रालयाचा एकेक, पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे प्रत्येकी दोन प्रश्‍न होते. आनंद शर्मा, भुवनेश्‍वर कलिता, विजय गोयल आदींना त्यांनी, ‘कृपया नेमके प्रश्‍न विचारा’, असे सक्तपणे सांगितले. 

दलवाई यांचे प्रश्‍न
हुसेन दलवाई यांनी वशिष्ठी नदीतील मगरींच्या वाढत्या संख्येबाबतचा व प्रस्तावित क्रॉकोडाइल पार्कचा प्रश्‍न मांडला. मूळ प्रश्‍न कोकणातील पर्यटनाबाबतचा असल्याने मंत्री प्रल्हाद पटेल यांनी तसे सांगितल्यावर त्यावर नायडू तो प्रश्‍नच रद्द करून त्यांना पुढचा उपप्रश्‍न विचारण्यास सांगितले. तेव्हा दलवाई यांनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला. त्यावर नायडू यांनी, ‘हे पाहा, एकाच प्रश्‍नात हे मगरींपासून छत्रपती शिवाजींपर्यंत पोचले’, असा शेरा मारताच हास्याची लकेर उमटली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News