क्षमता ओळखून विद्यार्थ्यांचा विकास करणे गरजेचे: आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके
राळेगाव येथे उद्योजकता, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळावा
यवतमाळ: आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. काही प्रमाणात लाजाळू असले तरी प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. या विद्यार्थ्यांची बुध्दी तल्लख असते. कुठलेही परिश्रम करण्यास ते मागेपुढे पाहत नाही. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जगातील सर्वात उंच शिखर पार करणाऱ्या सुषमा मोरे या विद्यार्थीनीचा आज येथे सत्कार झाला. असे सुप्त गुण अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. फक्त त्यांची क्षमता ओळखून त्यांना चालना दिली तर त्यांचा विकास नक्कीच होईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
राळेगाव येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पांढरकवडा यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा तर मंचावर राळेगावच्या नगराध्यक्षा माला खसाळे, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, संशोधन परिक्षण संस्थेच्या प्रभारी आयुक्त नंदिनी आवडे, उपसंचालक हंसध्वज सोनवणे, पुसद व पांढरकवडा येथील एकत्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक आत्माराम धाबे, उद्योजकता विभागाचे समन्वयक दिवाकर केसकर, श्री. रामटेके आदी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना, सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उद्योजकता, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी मुला-मुलींना स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक विषयांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या बजेटपैकी 50 टक्के बजेट हे शिक्षणावर खर्च केले जाते. शैक्षणिकदृष्टया व कौशल्य विकासात्मकदृष्टया विद्यार्थी जागृत असला पाहिजे, हाच आपला मानस आहे. या विभागाच्या प्रधान सचिवांचे आदिवासी बांधवांच्या विकासाकरीता अतिशय चांगले नियोजन आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिकत आहे. आदिवासी विद्यार्थी हा उद्योजक बनण्याची मानसिकता ठेवतो, ही अतिशय चांगली बाब आहे. येथे आयोजित केलेल्या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना नक्कीच होईल. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व व्यक्तिमत्व विकास करून स्पर्धेत टिकणे, हा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणाच्या वशिल्याची गरज नाही. बुध्दीमत्ता आणि गुणवत्ता पाहूनच या सरकारमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गुणवत्ता पाहूनच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे, असे डॉ. अशोक उईके यांनी सांगितले
यावेळी बोलतांना विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या, आदिवासी विकास विभागाचे बजेट सात हजार कोटी आहे. यापैकी जवळपास तीन हजार कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले जातात. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे 502 शासकीय आश्रमशाळा, 550 अनुदानित शाळा, 499 शासकीय वसतीगृहे, इंग्रजी माध्यमाच्या 16 एकलव्य स्कूल चालविले जातात. यात जवळपास पावणेपाच लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ही जबाबदारी अतिशय मोठी आहे. विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त चांगले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा विभाग प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माळ अर्पन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मान्यवरांनी पाहणी केली. मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट चढाई करणारी इयत्ता बारावीची विद्यार्थीनी सुषमा वासुदेव मोरे हिचा तिच्या पालकांसमवेत मान्यवरांनी सत्कार केला. तसेच चंद्रशेखर आमले, समाधान जोशी, जमुना जांबेकर, आकाश मेश्राम यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र व अवजार किट देण्यात आली. तर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण करणारे सोनाली वडमे, सुवर्णा तुमडाम, नेहा उईके, आशिष मगरे, स्नेहा सयाम, रोशनी झुकनाके, अतुल टेकाम, अर्जुन आत्राम आदींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक हंसध्वज सोनवणे यांनी तर संचालन शैलेश भगत यांनी केले. कार्यक्रमाला जि.प.सदस्या उषा भोयर, चित्तरंजन कोल्हे, पं.स.सदस्य शिला सडाम, प्रशांत तायडे, उमरीचे सरपंच वरुण राठोड यांच्यासह शाळा-महाविद्यालयातील तसेच विविध आश्रमशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.