अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • पवित्र पोर्टलवर सूचना; ९ ऑगस्टपासून प्रक्रिया

नाशिक - राज्यात तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला आखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ९ पासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर शुक्रवारी याबाबत सूचना झळकली. त्यानुसार ९ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १६ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीसह प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दोन वर्षांचा डी. एड., बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरदेखील सरकारने प्रथम टीईटी, त्यानंतर अभियोगता चाचणी असे टप्पे भरतीसाठी ठरविले होते. त्याप्रमाणे तरुणांनी दोन्ही परीक्षांमध्ये गुणवत्ता सिद्ध केली. त्यातून राज्यभरातील ८४ हजार गुणवत्ताधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान, शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे घेण्याची घोषणा होऊनही जवळपास दोन वर्षे उलटली तरी प्रशासकीय तर कधी तांत्रिक बाबींमध्ये अडकलेली ही प्रक्रिया कधी पूर्ण होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. महिन्यापूर्वीच राज्यातील ८४ हजार ४१३ उमेदवारांनी मध्यम, विषय, गुणनिहाय प्राधान्यक्रम दिले होते. त्यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्थासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्राधान्यक्रमाची प्रक्रिया झाली. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून आपली संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली होती.

नियुक्तीपत्रांविषयी अनिश्‍चितता  
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सध्या भरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याविषयी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याबाबत न्यायालयात पुढील सुनावणीत काय निर्णय होतो आणि त्यानंतर सरकार कोणती पावले उचलेल, याकडेही उमेदवारांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे भावी शिक्षकांचा मार्ग सुखकर होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नियुक्तीपत्रावरील तात्पुरत्या स्थगितीविषयी व निवड यादी पारदर्शक पद्धतीने लागावी यासाठी शिक्षण आयुक्त व मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
- संतोष मगर, अध्यक्ष डी. टी. एड., बी. एड्‌. स्टुडंट असोसिएशन

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News