बंडखोरांची मंत्रिपदासाठी धडपड : भाजपकडून मात्र दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनिश्‍चितता, भाजपकडून आश्‍वासन नाही

मुंबई - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र, विस्ताराची तारीख अद्याप ठरलेली नाही. त्यातच काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही भाजपकडून कोणतेही आश्‍वासन मिळत नसल्याने त्यांची भाजप कार्यालय व मंत्रालयात धावपळ सुरू आहे. 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांचे मंत्रिमंडळ विस्तारात पुनर्वसन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्लीवारी केली असून, १२ जून रोजी विस्तार होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अद्याप सरकारला विस्ताराचा मुहूर्त सापडलेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार १४ किंवा १६ जून रोजी होईल. मात्र, त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. परंतु, अधिक बोलण्यास नकार दिला. 

दुसरीकडे काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. मात्र, काँग्रेस सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना पुनर्वसनाची हमी आवश्‍यक आहे. मात्र, काही नेत्यांचे मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असल्याने भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे सध्यातरी कुणालाही आश्‍वासन द्यायचे नाही, असा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे अनेक बंडखोर आजी-माजी आमदार हवालदिल झाले असून, त्यांची मंत्रालय आणि भाजप कार्यालयात धावपळ सुरू आहे.

विखे पाटील यांनी फडणवीस यांची आज मंत्रालयात भेट घेतली. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या प्रश्‍नासंदर्भात फडणवीस यांची भेट घेतल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. मात्र, भाजपप्रवेश आणि मंत्रिमंडळ विस्ताराची त्यांना आस लागल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगत आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विखे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 
यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे आणि कालिदास कोळंबकर यांनीही मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

काँग्रेसमधून भाजपात येणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे. मात्र, बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने आम्ही कुणालाही कमिटमेंट देत नाही.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

निळवंडे धरणाच्या प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली नाही.
- राधाकृष्ण विखे पाटील,
माजी विरोधी पक्षनेते

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News