‘स्प्लिट्‌सविला’च्या सूत्रसंचलनाचे आव्हान - सनी

स्नेहा गावकर
Saturday, 3 August 2019

‘एम टीव्ही’ वाहिनीवरील ‘स्प्लिट्‌सविला’ या रिॲलिटी शोच्या पाच सीझनचे सूत्रसंचालन अभिनेत्री 

सनी लिऑनीने उत्तमरित्या केलं. आता ‘स्प्लिट्‌सविला’च्या बाराव्या सीझनचेही सूत्रसंचालन सनीच करणार आहे. याच निमित्त तिच्याशी केलेली ही बातचीत...

याआधीच्या ‘स्प्लिट्‌सविला’ सीजनमध्ये आणि आताच्या ‘स्प्लिट्‌सविला’च्या १२व्या सीजनमध्ये काय फरक आहे?
‘स्प्लिट्‌सविला’च्या इतर आणि आताच्या सीजनमध्ये नक्कीच फरक आहे. या सीजनमध्ये नवनवीन चेहरे सहभागी होणार आहेत. तसेच हे सीझन एका नव्या लोकेशनवर शूट केले जाईल. या सीजनमधून स्पर्धकांपुढे नवनवीन आव्हाने घेऊन आम्ही येणार आहोत. शिवाय काही हटके टास्क आम्ही स्पर्धकांसाठी ठेवले आहेत. अधिक नवनवीन गोष्टी कशा प्रकारे प्रेक्षकांच्या समोर आणता येतील यासाठी आमची संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.

 आताची तरुण पिढी आणि रिॲलिटी शो यांच्यात एक दुवा निर्माण झाला आहे, असे तुला वाटते का?
सध्याची तरुण पिढी ही सगळ्याच बाबतीत सरस आहे. या तरुणांच्या कलागुणांना खरा वाव मिळतो तो छोट्या पडद्यावरील रिॲलिटी शोमुळेच. डान्स, गायन अशा बऱ्याच रिॲलिटी शोमधून अनेक तरुण पुढे आले आहेत. ‘स्प्लिट्‌सविला’मध्येही नव्या स्पर्धकाची निवड करताना त्यांच्यामधील टॅलेंट सर्वात आधी पाहिलं जातं. ‘स्प्लिट्‌सविला’साठी जो तरुणवर्ग ऑडिशनसाठी येतो त्यांच्यामधील कलागुण, त्यांचे ज्ञान पाहून मीही भारावून जाते. खरं तर आता स्पर्धाही खूप वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे.

 बॉलीवूड चित्रपटसृष्टीविषयी तुझे काय मत आहे?
बॉलीवूड चित्रपटसृष्टीत काम करायला मला खरंच आवडतं. ‘जिस्म’, ‘रागिणी एम एम एस’, ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात मी काम केलंय. बॉलीवूडमध्ये काम करत असताना कलाकारांमध्ये असणारी चढाओढ, स्पर्धा मला जाणवली. पण सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासोबतचा माझा अनुभव छान होता. सध्या मी ‘कोकाकोला’ हा चित्रपट करत आहे.

या पाच वर्षांत इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना चित्रपटसृष्टीमध्ये कोणते बदल घडले आहेत, असे तुला वाटते?
या पाच वर्षांत इंडस्ट्रीमध्ये नक्कीच बदल झाला आहे. जसं मी आधीच म्हणाले, की स्पर्धा वाढली. सुरुवातीला स्पर्धा कमी होत्या. आता त्यांचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे कलाकारांचा कल अधिक जाणवतोय. सगळ्यांना डिजिटल माध्यम आवडू लागले आहे. शिवाय इंडस्ट्री तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक प्रगत होत चालली आहे. 

हॉलीवूड चित्रपटसृष्टीतही तू काम केलं आहेस. त्याबद्दलचा तुझा अनुभव काय आहे?
हॉलीवूड चित्रपटसृष्टीत मी भरपूर काम केलं आहे आणि अजूनही हॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर मला येत असतात. ‘फ्रेंड्‌स विथ बेनिफिट’, ‘द ओव्हरनाईट’ यासारखे बरेच हॉलीवूड चित्रपट केले. हॉलीवूडमध्ये काम करणे मला खूप सोईस्कर वाटते. हॉलीवूड चित्रपट आहेत म्हणून काम करायला होकार द्यायचा, हे माझ्या मनाला कधीच पटलं नाही आणि पटणारदेखील नाही. कथा, भूमिका यामध्ये वेगळेपणा असेल तरच मी हॉलीवूड चित्रपट करते. कारण कोणताही चित्रपट करत असताना त्याची कथाही तितकीच चांगली असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. 

‘करणजीत कौर’ या वेबसीरिजमध्ये तुझा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला. पण त्यानंतर तू वेबसीरिजकडे फिरकलीच नाहीस. यापुढे तू वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार का? 
मी स्वतः ‘करणजित कौर’ वेबसीरिजमध्ये काम केले आहे आणि मला हेही सांगायला आवडेल, की जर मला वेबसीरिजची ऑफर आली तर ती वेबसीरिज करायला मला नक्कीच आवडेल. सध्या तर काय डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे वेबसीरिजमध्ये मी आनंदाने काम करायला तयार आहे. खरं तर मनोरंजन क्षेत्रात वेबसीरिजने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवाय वेबसीरिजचा कन्टेंट तगडा आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News