काँग्रेस मागोमाग राष्ट्रवादीला सुद्धा गळती? या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवे
  • एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना यश

शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाणे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थान खालसा झाले आहे. सेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या कामगिरीने जिल्ह्यात युतीचा बोलबाला सुरू झाला आहे.

काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. अनेक वर्षांपासून शहरी भागात जम बसवलेल्या युतीला ग्रामीण भागात शिरकाव करताना मर्यादा येत होत्या, पण २०१४ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हादरे बसण्यास सुरुवात झाली.

लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाडची जागा राखता आली नाही; तर शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा यांनी विजय मिळवला होता. आता बरोरा यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भिस्त ठेवली होती; मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भिवंडीत पक्षाची पीछेहाट झाली. आता शहापूरच्या गडाला खिंडार पडले आहे. त्यात मुरबाडमध्येही राष्ट्रवादीला रोखण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही युतीचा बोलबाला सुरू झाला आहे.

बरोरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध
किन्हवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याला शिवसैनिकांनी विरोध सुरू केला आहे. त्यांना शिवसेनेकडून तिकीट दिले, तर त्यांना मोठे आव्हान निर्माण करण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. याबाबत बुधवारी डोळखांब येथे बैठक झाली. स्वपक्षातील डावलून आयात उमेदवाराला उमेदवारी दिली अथवा कुठल्याही पदाधिकाऱ्यावर कारवाई केली, तर सामुदायिक राजीनामे देण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News