पावसाळी पर्यटनाला उधाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

पर्यटक पाऊस व धुक्‍याच्या दुलईत गरमागरम मक्‍याची कणसे, भाजलेल्या शेंगा, चणे तर हौशी पर्यटक थंड आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत आहेत. भन्नाट वारा अनुभवत पर्यटक पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेत आहेत.

भिलार :  पर्यटननगरी महाबळेश्वर आणि पाचगणीत पावसाळी पर्यटनास प्रारंभ झाला असून, पावसाळी ऋतूच्या निसर्गातील विविध छटा अनुभवण्यास तसेच संततधार पावसात चिंब भिजण्यासाठी पर्यटकांनी पर्यटनस्थळावर गर्दी केली आहे.

यंदा मॉन्सून उशिरा आल्याने वर्षा पर्यटनाची सुरवात उशिरा झाली. पूर्ण जून महिना कोरडाच गेला. जून महिन्याच्या शेवटच्या चार दिवस झालेल्या पावसामुळे डोंगरकपारीत लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले असून, पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. 

पर्यटक पाऊस व धुक्‍याच्या दुलईत गरमागरम मक्‍याची कणसे, भाजलेल्या शेंगा, चणे तर हौशी पर्यटक थंड आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत आहेत. भन्नाट वारा अनुभवत पर्यटक पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेत आहेत.

स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच, असेच येथील पर्यटकांची भावना आहे. डोंगर, पठारांनी हिरवा शालू परिधान केला आहे. धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. तर काही जण धबधब्यासमोर "सेल्फी' काढण्यात गुंग आहेत. लहान-थोर आबालवृध्द सगळे यात सामील होताना दिसून येत आहेत. 

अधूनमधून पाऊस उसंत घेत असला तरी "कधी ऊन तर कधी बेफाम पाऊस' असा पाठशिवणीचा खेळ पर्यटकांना अनुभवण्यास मिळत आहे. सृष्टीची वेगवेगळी मोहक रूपे धारण करणाऱ्या या पर्यटननगरीत कोसळणाऱ्या संततधार पावसात अनेक हौशी पर्यटक आवर्जून मनमुराद भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत. 

टेबल लॅंडवर भिजण्यासाठी गर्दी 
टेबल लॅंडवर पावसात फक्त आणि फक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. धुके, पाऊस आणि थोडेसे ऊन अशा भन्नाट वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक चिंब झाले आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News