मुंबईकरांचे पाऊसहाल सुरू; स्टेशनवर पाणी, घरात पाणी आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • अनेक ठिकाणी पडझड; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळित
  • सकाळपासूनच संततधार सुरू असल्यामुळे उपनगरांत काही ठिकाणी पाणी साचले ​

मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. २९) संततधार सुरू राहिली. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भिंती, इमारतींचे भाग कोसळण्यास आणि झाडे उन्मळून पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या दणक्‍यामुळे शनिवारी उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून तिन्ही मार्गांवर प्रवाशांची कोंडी झाली, रस्ते आणि पदपथांची दैना सुरू झाली. दरम्यान, तलावांच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईत शनिवारी (ता. ३०) जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून, काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. 

मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी कुलाबा येथे ४६.८ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे ६९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

सकाळपासूनच संततधार सुरू असल्यामुळे उपनगरांत काही ठिकाणी पाणी साचले होते. पाऊस वाढण्याच्या शक्‍यतेमुळे कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार धास्तावले होते. पावसाचा मारा सुरू राहिल्यामुळे अनेक लोकल रद्द झाल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. उशिराने धावणाऱ्या लोकल तुडुंब भरल्या होत्या. रस्ते वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले होते. 

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची दुर्दशा सुरू झाली आहे. पावसाने जोर धरल्यास रस्त्यांची लवकरच चाळण होण्याची दाट शक्‍यता आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यास किंवा पाणी साचल्यास नागरिकांना ट्विटरवरून तक्रारी करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. रस्त्यांवरील खड्डे कोल्डमिक्‍स तंत्रज्ञानाने बुजवले जातील, असे प्रशासनाने सांगितले आहे.

पावसाच्या आगमनाबरोबर झाडे आणि बांधकामांची पडझडही सुरू झाली. कुर्ला स्थानकाच्या पश्‍चिमेकडील सकीना मंजिल या धोकादायक इमारतीचा काही भाग आणि घाटकोपर पश्‍चिमेकडील एकविरा सोसायटीच्या भिंतीचाही भाग पडला. या दुर्घटनांत जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पाणीसाठा वाढू लागला
तलावांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसामुळे पाणीसाठ्यात ६००० दशलक्ष लिटर वाढ झाली. शुक्रवारी तलावांत ७१,५७६ दशलक्ष लिटर (४.९५ टक्के) पाणीसाठा होता; तो शनिवारी ७६,८३३ दशलक्ष लिटर (५.३३ टक्के) झाला आहे. तलावक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल, असा विश्‍वास महापालिकेच्या जलअभियंता खात्याने व्यक्त केला.

दिवसभरात...
शॉर्टसर्किट : ११
उन्मळलेली झाडे : १११
बांधकामांची पडझड : १३ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News