पाणी पावसाचे, उजेड मेणबत्तीचा; रात्र धाकधुकीची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • महापुराने केली दैना; कोल्हापूरवासीयांची न भूतो न भविष्यति अशी चार दिवस झाली कोंडी

कोल्हापूर - वीज नाही, पाणी नाही, मोबाईल चार्जिंग नाही, एकही रस्ता वाहतुकीसाठी मोकळा नाही आणि पेट्रोलचा तर पत्ताच नाही, अशा दैन्यावस्थेत कोल्हापूरकरांनी आजचा सलग चौथा दिवस काढला. शहराच्या तीनही बाजूंनी पाणी आणि टॅंकरवर झुंबड, त्याचबरोबर बाटली व त्यांमधील पाण्यासाठी रांगा, अशी विचित्र स्थिती अनुभवली. 

याही स्थितीत लोकांनी दिवस कसाबसा काढला; पण रात्री रस्त्यावर अंधार, घरात अंधार आणि पावसामुळे साऱ्या रस्त्यावर शुकशुकाट हा धडकी भरवणारा रात्रीचा क्षणही अनुभवला. वीज नसल्यामुळे घरातील बॅटरी चार्ज करता आल्या नाहीत. त्यामुळे मेणबत्तीचा मंद लुकलुकत प्रकाश या काळात मोठा आधार ठरला.अर्थात महापुराची गंभीर स्थिती पाहून लोकांनी फारसे न कुरकुरता ही स्थिती सहन केली आणि ती बदलावी म्हणून प्रशासनाकडे नव्हे, तर चक्क आकाशाकडे डोळे करून पावसा आता थोडं थांब अशी आर्त प्रार्थनाही करण्यास सुरवात केली.

अनेक ठिकाणी विद्युत वितरणासाठी असलेली पूरक यंत्रणा पाण्याखाली आहे. त्यामुळे वीज चालू ठेवली, तर आणखी काहीतरी अनर्थ नको म्हणून वीजपुरवठाच बंद केला. तब्बल ४६ हजार घरात या क्षणी लाईट नाही, हे वास्तव आहे. पाणी उतरल्यानंतर वीजपुरवठा होणार हे त्यामुळे स्पष्ट आहे. या स्थितीत पहिल्या दिवशी आपापल्या घरातील बॅटरी, चार्जिंगची सुविधा असलेले दिवे कंदील याचा प्रत्येकाने वापर केला. दुसऱ्या, तिसऱ्या दिवसापासून चार्जिंग संपल्याने प्रकाश अंधुक होत गेला व त्यानंतर मेणबत्त्यांचा वापर सुरू झाला. मेणबत्ती खरेदीसाठी झुंबड उडाली व गेल्या काही वर्षात सलग बारा बारा तास मेणबत्तीचा प्रकाश वापरण्याची सवय नसलेल्यांनी मेणबत्तीच्या मंद लुकलुकणाऱ्या प्रकाशातच रात्र काढली. अनेक घरात काल रात्री मेणबत्ती हीच मोठा आधार ठरली.

मोबाईल चार्जिंग नसल्याने बहुसंख्यांच्या मोबाईल स्वीच ऑफ झाले. क्षणाक्षणाला मोबाईलमध्ये मान खुपसून बसणाऱ्यांना तर ही परिस्थिती मान्य करणे अवघड होऊन गेले. यातला थोडा अतिशयोक्तीचा भाग सोडला तर पुराच्या या आणीबाणीच्या काळात एकमेकांशी संपर्क साधणेही लोकांना अशक्‍य झाले. एरवी तासन्‌तास मोबाईलवर बोलणाऱ्यांना तर मोबाईलच्या बॅटरीचे महत्त्व खऱ्या अर्थाने गेल्या दोन दिवसांत समजले. मोबाईल बंद पडेल म्हणून नेमक्‍या शब्दात बोलूनच अनेकांनी बॅटरीला जपले. मात्र खरोखर पुरात अडकलेल्यांची व मोबाईल चार्जिंग संपलेल्यांची अवस्था या परिस्थितीत खूप अडचणीची झाली. त्यांना बाहेर संपर्क साधता आला नाही. त्यांना मदतीसाठीही कोणाशी बोलता आले नाही.

पिण्याचे पाणी चार दिवस न आल्याने लोकांना पाण्यासाठी टॅंकर आणि विकत मिळणाऱ्या बाटल्या, कॅनवर अवलंबून राहावे लागले. महापालिकेने टॅंकरचा पुरवठा सुरू ठेवला; पण संपूर्ण शहरात हा प्रश्न असल्याने या पाणी पुरवण्यात व्यत्यय निर्माण झाला. अनेकांनी बाटली व त्यांमधील पाण्याचा आधार घेतला आणि या क्षणाचा गैरफायदा काही विक्रेत्यांनी घेतला. या विक्रेत्यांनी जादा दराने पाणी विकून आपले हात धुवून घेतले. लोकांनीही अक्षरशा रांगेत उभे राहून हे पाणी विकत घेतले. 

पेट्रोल विक्री बंदचा फार मोठा फटका दैनंदिन जीवनास बसला. पेट्रोल नसल्यामुळे दुचाकी वाहने दारातच बंद अवस्थेत राहिली. ज्यांच्या वाहनांत पेट्रोल होते, त्यांना वाहने काटकसरीने चालवावी लागली.

अजून दोन-तीन दिवस पाणी बंद
पाणीपुरवठ्याची बंद स्थिती आणखी दोन-तीन दिवस तरी राहणार असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. कारण शिंगणापूरचा केंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू होऊ शकणार नाही हे स्पष्ट आहे आणि आणखी दोन दिवस तरी पुराचे पाणी उतरण्याची शक्‍यता नाही.

वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणे हेदेखील पुराचे पाणी ओसरण्यावर अवलंबून आहे. पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी उतरल्यावर सर्व सबस्टेशन मधील उपकरणे कोरडी करून घ्यावी लागणार आहे. हे काम पुराचे पाणी पाणी उतरल्यावरच हे शक्‍य होणार आहे. शहरात जवळपास पावणेदोन लाख वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ४५ हजार जणांचा वीजपुरवठा बंद आहे. दुधाळी सबस्टेशनमध्ये पाणी घुसल्याने ते शंभर टक्के बंद आहे. 
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी महावितरण

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News