एक पाऊस... त्यांचा आणि आमचा

सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी, जालना
Saturday, 27 July 2019

आम्ही आपली वाट पाहतो पावसाची
दुष्काळ, टंचाईचे दृष्टचक्र संपायला...  
एक पाऊस त्यांचा आणि एक आमचा

एक पाऊस..
त्यांचा आणि एक आमचा

त्यांना पाऊस हवा आहे 
आम्हाला ही हवा...
एक पाऊस त्यांचा 
आणि एक पाऊस आमचा...

त्यांना पाऊस हवा 
गरमागरम भजे,  भाजलेले मकेचे कणीस
आणि वाफळणारा गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला... 

आम्ही आपली वाट पाहतो पावसाची
दुष्काळ, टंचाईचे दृष्टचक्र संपायला...  
एक पाऊस त्यांचा आणि एक आमचा

काहींना पाऊस हवा गाडीतून फिरायला,
डोंगरावर सेल्फी काढायला,
प्रियसी,  बायको वा मित्रांसोबत एन्जॉयमेंट करायला

आम्ही वाट पाहतोय पावसाची,
टँकर आणि चारा छावण्या बंद करायला...
त्यांनाही पाऊस हवा आणि आम्हालाही...

पाऊस आला की धबधबे पाहायला, 
पावसात नाचून गाऊन रेन -डान्स करायला 
कुठंतरी लॉंग ड्राइव्हवर जायला
त्यांना पाऊस हवा...

आम्ही वाट पाहतो 
कोरडे पडलेले नदी नाले वाहायला 
अन् विहिरीत घोटभर पाणी प्यायला...
त्यांनाही पाऊस हवा आणि आम्हालाही...
 
पाऊस हवा त्यांना गच्चीवरील बागा 
अन्  शो केस मधील फुले फुलवायला...
चातकासारखी वाट पाहतो आम्ही 
शेतात नेऊन उदार होऊन पेरलेले उगवायला 
अन् उगवलेल जगवायला...
त्यांना पाऊस हवा 
अन आम्हालाही हवा...

एक पाऊस सर्वांच्या मनात,
स्वप्न बघत, स्वप्नात जगणाऱ्याचा...
एक पाऊस आमचा 
स्वप्न पडण्यासाठी झोप लागावी म्हणून
ईश्वराकडे हात जोडणाऱ्याचा...

एक पाऊस त्यांचा स्वप्नाचा शिडकावा..
आणि एक पाऊस आमचा अश्रुचा शिडकावा....

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News