काँग्रेसचा नवा अध्यक्ष राहुल गांधीच निवडणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • नवा अध्यक्ष निवडीसाठीची यंत्रणा राहुल यांनीच नेमणे आवश्‍यक
  • जनार्दन द्विवेदींची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : काँग्रेसमधील गोंधळावर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांमध्ये माजी सरचिटणीस जनार्दन द्विवेदीही सहभागी झाले असून, ‘नवा अध्यक्ष निवडीसाठीची राहुल गांधींनीच यंत्रणा नेमणे आवश्‍यक होते,’ अशी स्पष्टोक्ती त्यांनी आज केली. सोबतच, राहुल गांधींचा राजीनामा आदर्श असल्याचे म्हणत द्विवेदी यांनी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही याचे पालन करावे, असा सल्ला दिला. 

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या काळात संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त झालेले जनार्दन द्विवेदी यांनी आज काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींवर मतप्रदर्शन करताना राहुल गांधींच्या निर्णयावर; तसेच कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांच्या वर्तनावरही आडवळणाने प्रश्‍न उपस्थित केले. आणखी एक वरिष्ठ नेते डॉ. करणसिंह यांनी कालच पत्र लिहून कार्यकारिणीची बैठक लवकरात लवकर बोलावण्याची आणि नवे अध्यक्ष व चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची मागणी केली होती. 

राहुल यांच्याकडून त्रुटी
समन्वय समितीच्या माध्यमातून यासाठीच्या बैठका होत असल्याचे ऐकिवात आहे. परंतु, अशी समिती अस्तित्वात आहे का, लोकसभा निवडणुकीसोबतच समन्वय समितीचे अस्तित्व संपल्याकडे लक्ष वेधताना द्विवेदी यांनी यामध्ये राहुल गांधींकडूनही यामध्ये त्रुटी राहिल्याचा दावा केला. काँग्रेस अध्यक्षांनीच अशी व्यवस्था नेमायला हवी होती, की कार्यकारिणीची बैठक बोलावून नव्या नावावर चर्चा करायला हवी होती. परंतु, ही त्रुटी राहिल्यामुळे आता यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यासाठी, सोनिया गांधींनी त्यांच्या आजारपणाच्या परदेश दौऱ्यावर जाताना पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी चार नेत्यांकडे सोपविली होती, याचेही उदाहरण द्विवेदी यांनी दिले.

राहुल यांना पुन्हा समन्स
अहमदाबाद : भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या तक्रारीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील दोन न्यायालयांनी समन्स बजाविले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांना ‘खुनाचा आरोपी’ म्हटल्याबद्दल आणि ‘सर्व चोरांचे नाव मोदीच असते’ असे विधान केल्याबद्दल तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुरत येथील न्यायालयाने राहुल यांना १६ जुलैला, तर अहमदाबाद येथील न्यायालयाने त्यांना ९ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News